करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना लोकांनी आता  काही होणार नाही असे समजून करोना प्रतिबंधाचे निकष पाळणे सोडून दिल्याने दिल्लीत रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती आहे याचे भान न सोडता लोकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

अनेक रुग्णालयातील डॉक्टर आणि तपासणी प्रयोगशाळातील अधिकारी यांनी सांगितले की, लोकांमध्ये करोनावर मात केल्याबाबत आत्मसंतुष्टतेची भावना निर्माण झाली आहे. विशेष करून आता सगळे काही सुरळीत झाल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.

राजीव गांधी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक बी.एल.शेरवाल यांनी सांगितले की, तरुण लोक कॅफेत बसले असतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकत आहेत. हे घातक आहे. त्यातून लोकांमध्ये सर्व काही सुरळीत झाल्याचा चुकीचा संदेश गेला आहे. अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असताना असा बेदरकार दृष्टिकोन योग्य नाही. अनेक लोक मुखपट्टी न लावता घराबाहेर पडत आहेत. किंवा चुकीच्या पद्धतीने ती वापरत आहेत. त्यामुळे संसर्ग पसरत आहे.

दिल्लीत रविवारी २०२४ नवीन रुग्ण सापडले असून ही एका दिवसातील मोठी संख्या आहे. एकूण रुग्णांची संख्या १.७३ लाख झाली असून मृतांची संख्या ४४२६ झाली, कारण रविवारी आणखी २२ मृत्यू झाले आहेत. शनिवारी १९५४ नवीन रुग्ण सापडले होते.