ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १४ हजार कोटींची देणी थकली असताना साखर कारखान्यांना ती देता येणे शक्य व्हावे यासाठी अतिरिक्त साखरेची निर्यात व पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुकूलता दाखवली आहे.
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात साखर उद्योगाचा आढावा घेण्यात आला. मोदी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यास मान्यता दिली आहे. सध्या साखरेचे मागणी- पुरवठा संतुलन बिघडले असल्याचे मान्य करून त्यांनी अतिरिक्त साखरेची निर्यात करण्यास सांगितले आहे. साखर उद्योगांनी अजून ऊस उत्पादकांना १४३९८ कोटी रूपये देणे बाकी आहे, साखरेचे उत्पादन जास्त असल्याने साखरेचे भाव कोसळले आहेत त्यामुळे थकबाकी देणे कठीण जात आहे. शेतकऱ्यांचे हित अग्रक्रमाने पहावे व साखर उद्योगातील समस्यांचा कालबद्ध आढावा घेतला जावा.
दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. मोदी यांनी सरकारने कारखान्यांना जाहीर केलेल्या ६ हजार कोटींच्या योजनेचा आढावा घेतला. साखरेच्या किंमती किलोला २० रूपये इतक्या खाली आल्या आहेत व उत्पादन खर्च किलोला ३० रूपये आहे. अजून साखरेचा १ कोटी टन साठा देशात अतिरिक्त आहे. साखर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. साखरेचे २०१४-१५ हंगामातील उत्पादन २८.३ दशलक्ष टन आहे.