जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन अतिरेकी दिल्लीत शिरल्याचा संशय असून ते अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यामुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्था आवळण्यात आली आहे. पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर जैश-ए-मोहम्मद या संघटनेनेच हल्ला केल्याचे पुरावे भारताला मिळाले आहेत. या संघटनेचे दोन अतिरेकी शहरात घुसले असून, ते हल्ले करू शकतात, अशी निश्चित माहिती गुप्तचर संस्थांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे.

माजी राजनैतिक अधिकाऱ्यांशी चर्चा
नवी दिल्ली : पठाणकोट येथील भारतीय वायुदलाच्या महत्त्वाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने रविवारी माजी परराष्ट्र सचिव आणि पाकिस्तानात काम केलेले राजदूत यांच्याशी पाकिस्तानबद्दलच्या धोरणाबाबत चर्चा केली.
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी बोलावलेल्या या बैठकीत एस.के. लांबा, जी. पार्थसारथी, श्याम सरन, शिवशंकर मेनन, सत्यव्रत पॉल, शरद सभरवाल आणि टीसीए राघवन हेही सहभागी झाले होते.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या असाधारण बैठकीचे तपशील न देता तिचे वर्णन ‘पाकिस्तानविषयक धोरणासंबंधी राजनैतिक चर्चा’ असे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे समपदस्थ नवाझ शरीफ यांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संवादाला चालना मिळाली असतानाच पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तिच्यावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत चर्चा सुरू असतानाच ही बैठक झाल्यामुळे ती महत्त्वाची आहे.

भारत-पाक संवादाच्या पुनरुज्जीवनासमोर आव्हान’
इस्लामाबाद : दहशतवाद्यांनी भारताच्या महत्त्वाच्या हवाई दल तळावर केलेल्या कोडग्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संवादाची प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांसमोर आव्हान उभे राहिले असल्याचे पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
या हल्ल्याची अखेर झाली असली तरी त्याने दोन शेजाऱ्यांदरम्यानचा मृतप्राय झालेला संवाद पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांपुढे आव्हान उभे केले असल्याचे ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने पहिल्या पानावरील मुख्य बातमीत म्हटले आहे. द्विपक्षीय बोलण्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला आकस्मिक भेट दिल्यानंतर एका आठवडय़ाने ही घटना घडली आहे. या दोन्ही देशांमधील संवादाचे प्रयत्नही अशा घटनांमुळे अनेकदा रुळांवरून घसरले आहेत.