प्रमुख रेल्वे स्थानकांवर, रेल्वे गाडय़ांत वाढीव सुरक्षा

राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल  आठवडय़ाभरात जाहीर होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने निमलष्करी दलाचे ४ हजार जवान उत्तरप्रदेशात रवाना केले आहेत. याचवेळी, रेल्वेतील सुरक्षाविषयक तयारीचा भाग म्हणून रेल्वे पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून देशभरातील ७८ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील आणि रेल्वेंमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सर्व संवेदनशील भागांमध्ये पुरेशा संख्येत सुरक्षा दलांचे जवान तैनात करावेत, असे सूचनापत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना केल्या असतानाच, अयोध्या मुद्याबाबत प्रक्षोभक वक्तव्ये करू नयेत किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन राजकीय नेत्यांनी लोकांना पुन्हा एकदा केले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यापूर्वी मंदिर- मशीद जमीन वादाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.  सदिच्छा निर्मितीचा भाग म्हणून, शांतता राखण्याचे आवाहन करण्यासाठी पोलीस हिंदू व मुस्लीम समुदायाच्या लोकांसोबत बैठका घेत आहेत.

उत्तर प्रदेशात, विशेषत: अयोध्येत कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकारला मदत करण्यासाठी मंत्रालयाने निमलष्करी दलांच्या ४० कंपन्या रवाना केल्या असल्याचे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिल्लीत सांगितले. या दलांच्या एका कंपनीत सुमारे १०० जवानांचा समावेश असतो.

रेल्वे पोलिसांनी त्यांच्या देशभरातील झोनसाठी सात पानांचे सूचनापत्र जारी केले असून, या निकालापूर्वी सुरक्षेबाबत काय तयारी करावी याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या असून त्यांना धावत्या रेल्वेगाडय़ांमध्ये तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.

रेल्वे स्थानके, तेथील फलाट, यार्ड, पार्किंगच्या जागा, पूल आणि बोगदे यांसह कारखाने आणि कार्यशाळा येथील सुरक्षेबाबत यात सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. ही संभाव्यपणे हिंसाचाराची ठिकाणे ठरू शकतात किंवा स्फोटके लपवण्यासाठी वापरली जाऊ शकतात, अशी ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई, दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील प्रचंड गर्दी असलेली ७८ प्रमुख रेल्वे स्थानके आरपीएफने निश्चित केली असून त्या ठिकाणी या दलाच्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.

निकालानंतर वातावरण तापल्यास, रेल्वे स्थानकांवरील किंवा त्यांच्या परिसरातील धार्मिक स्थळे संघर्षांची केंद्रे ठरू शकतात, त्यामळे अशा सर्व स्थळांवर बारकाईने नजर ठेवावी, असे आरपीएफच्या सूचनांमध्ये म्हटले आहे. अशा स्थळांच्या देखरेखीसाठी तैनात असलेल्यांनी ती संरक्षणाशिवाय सोडून जाऊ नये, असेही त्यात नमूद केले आहे. वीज वाचवण्यासाठी, ज्या रेल्वे स्थानकांवर गाडय़ा नसतील तेथील ३० टक्के दिवेच सुरू ठेवण्याची मुभा देणारा जो आदेश यापूर्वी जारी करण्यात आला होता, तो मागे घेण्यात आला असून आता १०० टक्के दिवे सुरू ठेवण्याचे निर्देश सर्व झोनला देण्यात आले आहेत.

विहिंपने दगड कोरीवकाम, अन्य कार्यक्रम थांबविले

विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) राम मंदिर बांधण्यासाठी करण्यात येत असलेले दगड कोरीवकाम १९९० नंतर प्रथमच बंद केले आहे. कोरीवकाम करणारे सर्व कारागीर आपापल्या घरी परतले आहेत, असे विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले. विहिंपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी कोरीवकाम थांबविण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. कोरीवकाम कधी सुरू करावयाचे याचा निर्णय रामजन्मभूमी न्यास घेईल, असे शर्मा म्हणाले. संघटनेचे सर्व प्रस्तावित कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.