समाजात फूट पाडणाऱ्या तसेच दहशतवाद व फुटीरतावाद पसरवणाऱ्या शक्तींच्या विरोधात नागरिकांनी संघटित व्हावे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. स्वातंत्र्यदिनी दिलेल्या संदेशात सोनियांनी देशातील विविधतेचे जे तत्त्व आहे ते राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा पद्धतीने देशाने प्रगती करावी अशी अपेक्षा सोनियांनी संदेशात व्यक्त केली आहे. अकबर रोड येथील काँग्रेसच्या मुख्यालयात सोनियांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पंतप्रधानांच्या भाषणाचे मेहबूबांकडून स्वागत

काश्मीरमधील फुटीरतावाद बंदुकीने नव्हे तर संवादाने रोखता येईल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे.  संवादातूनच मार्ग काढता येईल यावर आपलाही विश्वास असल्याचे मेहबूबांनी स्पष्ट केले. ‘बंदूक से ना गोली से बात बनेगी बोली से’ ही घोषणा पीडीपीने १५ वर्षांपूर्वीच दिल्याची आठवण मेहबूबांनी करून देत, ती आजही लागू असल्याचे स्पष्ट केले.