देशातील विविध भागातील जनतेमध्ये यंदाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. कारण, देशभरात विविध ठिकाणी लोकांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर फटाके फोडून, देशभक्तीपर गीते गाऊन आणि वाजवून स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त केला आहे.


मुंबईतील मुलूंड येथे अभिनेते आणि शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यरात्री झेंडावंदन करीत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच घाटकोपर येथे राम कदम यांनी मध्यरात्री कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मंत्री अरुप बिस्वास यांच्या हस्ते मध्यरात्री राष्ट्रध्वज फडकावत आणि फटाके फोडत स्वांतत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे स्थानिक लोकांनी मेस्टन रोड येथील एका चौकात ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काही तरुणांनी आकर्षक फटाके उडवत स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त केला.


दरम्यान, दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, चेन्नई या प्रमुख मेट्रो शहरांसह अनेक भागात स्वांतत्र्यदिनाच्या दिवशी काही अघटित घडू नये यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच खडा पहारा ठेवला आहे. पोलीस कर्मचाऱी रात्री उशीरा घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या वाहनांसह त्यांची चौकशी करीत होते.


स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जुन्यासह नव्या अनेक इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून मध्यरात्रीच्या सुमारास ही रोषणाई लोकांचे लक्ष वेधून घेत होती. यामध्ये दिल्लीतील राजपथावरील राष्ट्रपतींचे निवासस्थान, संसद भवन, मुंबईतील सीएसएमटी, महानगर पालिकेचे कार्यालय तसेच अनेक ठिकाणी तिरंग्याच्या रंगात सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.