पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७२ व्या स्वातंत्र्य दिनी ८५ मिनिटांच्या भाषणात करदात्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. नरेंद्र मोदींनी भाषणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावाही केला. प्रामाणिक करदात्यांमुळे गरीबांना सरकारकडून स्वस्त दरात खाद्यपदार्थांचा पुरवठा करणे शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले, आपल्या देशातील कोट्यवधी गरीबांना दोन किंवा तीन रुपयांमध्ये जेवण मिळते. सरकार यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते. मात्र, याचे श्रेय सरकारला जात नाही. तर देशातील प्रामाणिक करदात्यांना याचे श्रेय जाते, असे त्यांनी नमूद केले.

प्रामाणिक करदात्यांमुळे सरकार गरीबांचे पोट भरत असून मी त्यांना नमन करतो. त्या प्रामाणिक करदात्यांमुळेच जनहिताच्या योजना राबवणे शक्य होते. या योजनांचे पुण्य करदात्यांनाच मिळते, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत जेवढी लोक करप्रक्रियेशी जोडली गेली तितकेच लोक गेल्या चार वर्षात करप्रक्रियेशी जोडली गेली, असा दावा त्यांनी केला. ‘देशात २०१३ मध्ये प्रत्यक्ष कर देणाऱ्यांची संख्या ४ कोटी होती. आता हाच आकडा सहा कोटी ७५ लाखांपर्यंत पोहोचला आहे. हे प्रामाणिकतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे’, असे त्यांनी सांगितले.

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेऊ, असा पुनरुच्चार मोदींनी केला. सरकार काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला माफ करणार नाही. कितीही संकट येऊ द्या, मी ही भूमिका सोडणार नाही. देशाला भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या वाळवीने पोखरले असून दिल्लीतील गल्लीबोळ्यात आता दलाल दिसत नाही. काळ बदलला आहे, असे त्यांनी नमूद केले.