पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७२ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त लष्करात काम करत असणाऱ्या महिलांना भेट दिली आहे. मोदी यांनी महिलांसाठी स्थायी कमिशनची घोषणा केली आहे. या माध्यमातून महिला सर्व पुरूषांप्रमाणे देशाची सेवा करू शकतील. शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे निवडलेल्या महिलांसाठी ही घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांना अधिक काळ सैन्य दलात काम करता येईल.

मोदी म्हणाले, भारतीय सशस्त्र सेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांना पुरूष समकक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे पारदर्शी निवड प्रक्रिये द्वारे स्थायी कमिशनची मी घोषणा करतो. वर्दी घालून जीवन जगत असलेल्या महिलांना ही भेट आहे.

काय होईल फायदा

स्थायी कमिशन लागू झाल्यामुळे महिला उमेदवारांना अधिक काळ लष्करात काम करता येईल आणि त्यांना इतर सुविधाही मिळतील. शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे नियुक्त होणाऱ्या उमेदवार १४ वर्ष (१० वर्षे अनिवार्य आणि ४ वर्षे अतिरिक्त) करू शकतात. तर स्थायी कमिशनमुळे महिलांना २० वर्षांपर्यंत काम करता येईल आणि त्यात वाढही करता येईल.

यापूर्वी शॉर्ट सर्व्हिस कमिशनचे अधिकारी १० वर्षांच्या सेवेनंतर स्थायी कमिशनसाठी पात्र ठरत. पण त्यांचा वार्षिक अहवाल चांगला हवा. तर स्थायी कमिशनचे अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये जाऊ शकत नाहीत. जर एखाद्ल्या जायचे असेल तर त्याने निवृत्ती घ्यावी लागते.