लाखो लोकांना गरिबीतून यशस्वीपणे बाहेर काढणारा भारत हा एक मुक्त समाज असलेला देश असल्याचे गौरवोद्गार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काढले. यावेळी त्यांनी कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढवणाऱ्या ओपेक राष्ट्रांवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. यूएनजीसीच्या या कार्यक्रमात जगभरातील अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत. सुमारे ३५ मिनिटे ट्रम्प बोलत होते.

उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्याबरोबरील बैठक यशस्वी ठरल्याचे सांगत आता उत्तर कोरियातून क्षेपणास्त्र उडताना दिसत नाही आणि ते आपल्या शेजारी राष्ट्राला धमकी देतानाही दिसत नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अमेरिकेकडून आर्थिक किंवा इतर बाबींची मदत घेणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशांना इशाराही दिला. भविष्यात अमेरिका त्यांनाच मदत करेन जे त्यांचा आदर करतील. कोण काय करत आहे, हे आम्ही पाहत आहोत. ज्या देशांना आमचे डॉलर मिळतात. ज्यांना आम्ही संरक्षण देतो. ते खरंच मनापासून आमचे हित जपतात किंवा नाही हे आम्ही पाहत आहोत, असे ते म्हणाले.

इराणवर आर्थिक निर्बंध घातल्यापासून ट्रम्प यांनी प्रमुख तेल उत्पादक देशांना (ओपेक) तेल उत्पादन वाढवण्यास सांगितले होते. परंतु, या देशांनी असे करण्यास नकार दिला होता. त्याचा उल्लेख ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केला. ओपेक दरवेळीप्रमाणे आताही इतर जगाचा अनादर करत, असल्याचा आरोप केला

इराणवर टीका करताना ते म्हणाले, हा देश अराजकता, मृत्यू आणि विनाशाकडे झुकत आहे. मला वाटतं की, ते या मार्गातून जोपर्यंत बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत सर्व देशांनी त्यांना एकटे पाडावे.