भारत-अमेरिका संबंध उत्तम स्थितीमध्ये आहेत असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले. रविवारी हाऊसटॉन येथे होणाऱ्या “हाऊडी, मोदी!” कार्यक्रमाला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती ही सन्मानाची बाब आहे असे जयशंकर म्हणाले. मंत्रालयात १०० दिवस झाले त्यापार्श्वभूमीवर जयशंकर माध्यमांशी बोलत होते. कुठल्याही संबंधांमध्ये मुद्दे हे असतात.

भारत-अमेरिकेमधील व्यापार समस्या ही सामान्य बाब आहे. व्यापारातील या समस्या सोडवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती जयशंकर यांनी दिली. “हाऊडी, मोदी!” कार्यक्रमात ट्रम्प आणि मोदी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीकांना संबोधित करतील. कार्यक्रमाचे इतके मोठे स्वरुप आणि त्याला ट्रम्प सारखी व्यक्ती येणार त्यावरुन भारतीय समुदायाला अमेरिकेत किती आदर आहे ते दिसते असे जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानला यातून काय संदेश मिळणार या प्रश्नावर जयशंकर म्हणाले की, फक्त पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जग हाऊसटॉनचा हा कार्यक्रम पाहिल व भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीकांनी काय साध्य केले आहे हे सर्वांना समजेल. या कार्यक्रमात अनेक संदेश दडलेले आहेत. यातून काय घ्यायचे ते पाकिस्तान ठरवेल असे जयशंकर यांनी सांगितले.

हाऊडी मोदी कार्यक्रमाला ट्रम्प यांची उपस्थिती हा पाकिस्तानसाठी झटका आहे. कारण पाकिस्तान अमेरिकेच्या मदतीने काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होता. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारत-अमेरिका भक्कम मैत्रीचा संदेश जाईल तसेच भारताची अमेरिकेत किती ताकत आहे ते दिसून येईल. डोनाल्ड ट्रम्प स्वत:चा राजकीय लाभ डोळयासमोर ठेऊन या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पुढच्यावर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी एवढया मोठया संख्येने उपस्थित असलेल्या भारतीय समुदायावर प्रभाव टाकण्याची त्यांना संधी आहे.

जयशंकर काय म्हणाले POK बद्दल
पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकव्याप्त काश्मीरवरची आमची भूमिका नेहमीच स्पष्ट व कायम आहे. पीओके हा भारताचा भाग आहे व आम्ही एकदिवस त्यावर प्रत्यक्ष ताबा मिळवू अशी अपेक्षा आहे असे एस जयशंकर म्हणाले.