अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होणार असून यामुळे देशाच्या निर्यातीत ३.५ टक्क्यांची तेजी निर्माण होईल, असे संयुक्त राष्ट्राच्या एका अभ्यासात समोर आले आहे. या व्यापार युद्धाचा सर्वाधिक फायदा हा युरोपीयन संघाला होईल. त्यांच्याकडे अतिरिक्त ७० अब्ज डॉलरचा व्यवसाय जाईल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हल्पमेंट (यूएनसीटीएडी) च्या अहवालात म्हटले आहे की, वॉशिंग्टन आणि पेईचिंग यांच्यादरम्यान सुरू असलेल्या टेरिफ युद्धाचा (एकमेकांच्या साहित्यावर शूल्क लावणे) फायदा अनेक देशांना होईल. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, फिलीपाईन्स, ब्राझील, पाकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

‘द ट्रेड वॉर्स: द पेन अँड द गेन’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, द्विपक्षीय टेरिफमुळे युरोपीय निर्यातीला ७० अब्ज डॉलरचा फायदा होईल. तर जपान, कॅनडा आणि मेक्सिकोच्या निर्यातीत प्रत्येकाला २०-२० अब्ज डॉलरचा फायदा होईल. यूएनसीटीएडीच्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिका-चीन यांच्यातील तणावाचा ज्यांचे अधिक प्रतिस्पर्धी आहेत आणि अमेरिका व चिनी कंपन्यांची जागा घेण्याची क्षमता राखतात, अशा देशांना फायदा मिळण्याची शक्यता आहे.

यूएनसीटीएडी आंतरराष्ट्रीय व्यापार प्रमुख पामेला कोक-हॅमिल्टन यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवेल आणि समुच्च आंतरराष्ट्रीय व्यापार प्रणालीवर याचा नकारात्मक परिणाम होईल.