देशभरात करोना रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ झाली असून जगभरातील सर्वाधिक दहा करोनाबाधित देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. सलग चौथ्या दिवशीही रुग्णांमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात ६,९७७ नव्या करोना रुग्णांची भर पडली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ५७,७२० रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४१.५७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,२८० रुग्ण बरे झाले. ७७,१०३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. एकूण मृत्यू ४,०२१ असून रविवारी दिवसभरात १५४ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत अनुक्रमे ६०८८, ६६५४, ६७६७ आणि ६९७७ अशी वाढ झाली आहे. रुग्ण दुपटीचे प्रमाण १३ दिवस असून मृत्यूचा दर २.९ टक्के इतका आहे.

बिहार- उत्तर प्रदेशमध्ये संख्यावाढ

बिहारमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले असून १९ मेपासून दररोज शंभरहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याआधीही एकादिवसात शंभर रुग्णांचा वाढ होत होती पण, ती अनियमित दिसत होती. पण, गेल्या सहा दिवसांमध्ये सातत्याने हा आकडा दोनशेच्या घरात गेलेला दिसत आहे. १८ मे रोजी ८३ रुग्णांची वाढ झाली. १९ ते २४ या सहा दिवसांमध्ये अनुक्रमे १२९, १०७, १७६, ३०८, १९५ आणि २०३ रुग्ण वाढले. बिहारमध्ये आता करोना रुग्णांची संख्या २,५८७ झाली असून सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये बिहार दहाव्या क्रमांकावर आहे. १० मे रोजी बिहारमधील रुग्णांची संख्या ७०० होती, ती १५ दिवसांमध्ये अडीच हजारहूनही अधिक झाली आहे. उत्तर प्रदेश आठव्या क्रमांकावर असून राज्यातील एकूण संख्या ६,२६८ झाली आहे. १९ मेपासून उत्तर प्रदेशमध्येही रुग्णवाढ वेगाने झालेली आहे. ही वाढ दररोज २०० ते ३५० च्या दरम्यान राहिली आहे.

दिल्लीत खासगी रुग्णालयांमध्ये २० टक्के खाटा राखीव 

महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही खासगी रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. दिल्लीतील ११७ खासगी रुग्णालयांमधील सुमार दोन हजार खाटा उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी दिली. खासगी रुग्णालयातील २० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत.

सध्या दिल्ली सरकारच्या अखत्यारितील दोन, केंद्र सरकारच चार रुग्णालये आणि ८ खासगी रुग्णालयांमध्ये प्रामुख्याने करोनाच्या रुग्णांना दाखल केले जाते. आजघडीला सुमारे ४ हजार खाटा उपलब्ध असून १,५०० खाटा रुग्णांसाठी वापरल्या जात आहेत. गरजेनुसार दिल्लीतील रुग्णांसाठी पाच हजारहून अधिक खाटा उपलब्ध असतील, अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.

३० लाख नमुना चाचण्या

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितानुसार, देशभरात ४२२ सरकारी व १७७ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज दीड लाख नमुना चाचण्या केल्या जात आहेत. आत्तापर्यंत सुमारे ३० लाख नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या देशात ९६८ करोना रुग्णालये असून त्यामध्ये २ लाख ५० हजार ३९७ खाटा उपलबध आहेत. २,०६५ करोना आरोग्य केंद्रे असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार खाटा आहेत. ७०६३ सेवाकेंद्रे असून त्यामध्ये ६ लाख ४६ हजार खाटा आहेत. आता देशात पुरेशा संख्येने एन-९५ मास्क व पीपीईची निर्मिती केली जात आहे. आत्तापर्यंत ७२.८ लाख पीपीई आणि १ कोटींहून अधिक एन-९५ मास्क पुरवण्यात आले आहेत.

सर्वाधिक करोनाबाधित दहा देश

* अमेरिका- १६ लाख ४३ हजार

*  ब्राझील- ३ लाख ६३ हजार

* रशिया- ३ लाख ४४ हजार

* ब्रिटन- २ लाख ६० हजार

* स्पेन- २ लाख ३५ हजार

* इटली- २ लाख २९ हजार

* फ्रान्स- १ लाख ८२ हजार

* जर्मन- १ लाख ८० हजार

* तुर्की- १ लाख ५६ हजार

* भारत- १ लाख ३८ हजार