भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना तोंड देण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारा उत्तेजन निधी पुरेसा नाहीय असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी देशाचा आर्थिक विकास दर जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये सुधारलेला दिसेल अशी शक्यताही बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. भारताचा आर्थिक विकासदर हा करोनाच्या साथीच्या आधीपासूनच मंदावलेला होतात, असंही बॅनर्जी यांनी एक ऑनलाइन कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलं आहे.

“भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चालू तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) सुधारणा पहायला मिळेल,” असं मत मांडतानाच बॅनर्जी यांनी २०२१ चा आर्थिक विकास दर या वर्षीपेक्षा चांगला असेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

सध्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत असणाऱ्या बॅनर्जी यांनी सध्या भारत सरकारकडून देण्यात येणारे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज हे पुरेसे नसल्याचे मत व्यक्त केलं आहे. जागतिक स्तरावर विचार करता भारताला आणखीन सक्षम होण्याची गरज आहे. “भारतामध्ये आर्थिक प्रोत्साहन म्हणून देण्यात आलेला निधी हा मर्यादित आहे. बँकांनाही यासंदर्भात पुढाकार घेतल्याचे पहायला मिळालं. आपण आणखीन काहीतरी करु शकतो असं मला वाटतं. अल्प उत्पन्न असणाऱ्या वर्गातील लोकांकडून अधिक खर्च होत असल्याचे पाहायला मिळालं नाही. कारण सरकार या लोकांच्या हातात पैसे देण्यास इच्छुक असल्याचे दिसत नाही,” असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- अर्थमंत्री म्हणतात, “करोना कधी जाणार, लस कधी येणार ठाऊक नाही; अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कायम राहणार”

महागाईसंदर्भात भाष्य करताना बॅनर्जी यांनी भारताचा आर्थिक विकास आराखडा हा बंद अर्थवस्थेला अनुसरुन आहे. या अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण केली जाते ज्यामुळे महागाई वाढते. “भारतामध्ये २० वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात महागाई आणि अधिक विकासदर अशी परिस्थिती होती. देशाला मागील २० वर्षांमध्ये महागाईचा दर नियंत्रणात ठेवल्याने फायदा झाला,” असं निरिक्षणही बॅनर्जी यांनी नोंदवले.