भारत आणि चीन हे दोन्ही देश बलाढ्य आहेत, ते एकमेकांना हरवू शकत नाहीत, त्यामुळे दोन्ही देशांनी सख्खे शेजारी होत, वैर बाजूला ठेवावं तसंच ‘हिंदी-चिनी भाऊ भाऊ’ हीच भावना जोपासावी असा सल्ला तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी सोमवारी दिला आहे. सद्यस्थितीत डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव आहे त्यात दलाई लामा यांनी केलेलं हे वक्तव्य सूचक आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यदलाचा विचार केला तर दोन्ही देशांची ताकद एकसारखी आहे, सीमेवर एका देशानं गोळीबार केला तर दुसऱ्याकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र यामुळे सीमा प्रश्न काही सुटत नाही, यापेक्षा दोन्ही देश एकमेकांचे चांगले शेजारी म्हणूनच राहिले तर या प्रश्नावर तोडगा निघू शकतो असंही दलाई लामा यांनी म्हटलं आहे.

तिबेटमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिबेटचं स्थानिक सरकार आणि चीनच्या पीपल्स रिपब्लिकनं १७ मुद्दे असलेला एक शांतता करार केला होता. जगातल्या बौद्ध धर्माला मानणाऱ्या देशांमध्ये चीन अग्रक्रमावर आहे, चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार असूनही देशानं बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर स्वीकारला आहे. आधी अशी परिस्थिती होती की तिबेटमध्ये धार्मिक आणि राजकीय चळवळींचे प्रमुख होते, मात्र २०११ पासून मी स्वतःला राजकारणापासून लांब ठेवलं आहे असंही दलाई लामा यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतानं चीनमधील बौद्ध धर्मियांसाठी तीर्थयात्रा सुरू कराव्यात!
भारतानं चीनमधील बौद्ध धर्मियांसाठी तीर्थयात्रा सुरू केली पाहिजे असा सल्ला दलाई लामा यांनी दिला आहे. बौद्ध धर्माच्या मार्गावर चालणारे अनुयायी हे भारतीय बौद्ध धर्माच्या वाटेवर वाटचाल करत आहेत, कारण बौद्ध धर्माचा उगम हा भारतात झाला. चीनमधील बौद्ध धर्मियांच्या अनुयायांसाठी जर भारतात तीर्थयात्रा सुरू झाल्या तर दोन्ही देशांमधील भावनात्मक देवाणघेवाण वाढेल, असंही दलाई लामा यांनी म्हटलं आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध सध्या बिघडलेले आहेत. चीनकडून भारताला युद्धाची धमकी दिवसाआड दिली जाते आहे. अशात आता तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी बंधुत्त्व जपण्याचा सल्ला दिला आहे. चीनला हा मान्य होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.