* लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून तणाव वाढला
* अतिक्रमण थोपवण्यासाठी भारत लष्करी कुमक पाठवणार
लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेल्या दहा किलोमीटरच्या घुसखोरीच्या मुद्यावरून भारत व चीनमधील तणाव वाढला आहे. दोन्ही लष्करांच्या ध्वजबैठकीत तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर मंगळवारी तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे चिनी सैन्याला थोपवण्यासाठी भारताने लडाखमध्ये लष्करी कुमक पाठविण्याची तयारी चालवली आहे.
लडाखमधील घुसखोरीबाबत चीनने पूर्वीप्रमाणे ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने मंगळवारी चीनला खडसावले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील मतभेदांमुळे चीनचा सध्याचा घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सैद अकबुरुद्दीन यांनी सांगितले.
‘घुसखोरीचा हा प्रकार १५ एप्रिल रोजी घडल्यानंतर भारताने चीनच्या भारतातील राजदूतांना पाचारण करून समज दिली आहे,’ असे ते म्हणाले. दुसरीकडे दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान ब्रिगेडियर पातळीवर मंगळवारी बैठक झाली. मात्र, चीन सैन्याने मागे हटण्यास नकार दिल्याने ही चर्चाही निष्फळ ठरली.
या पाश्र्वभूमीवर, चीनने या भागात ठोकलेले ठाणे उठवून माघार घेतली नाही, तर अतिरिक्त लष्करी बळ या भागात पाठविण्यात येईल, असा इशारा भारताने दिला आहे. पहाडी युद्धात तज्ज्ञ असलेले लडाख स्काऊटचे पथक लडाखमध्ये पाठविण्यात आले आहे. येथील सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांवर आहे. या दलाचा तळ लडाखमधील चीनच्या तळाच्या विरुद्ध बाजूला ३०० मीटर अंतरावर आहे.
अशी ही घुसखोरी..
चिनी लष्कराची एक तुकडी दौलत बेग ओल्डी विभागातील बुर्थे या ठिकाणी भारतीय हद्दीत १० किलोमीटर घुसली आहे. या ठिकाणी चिनी लष्कराने तंबू ठोकून ठाणे निर्माण केले आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 24, 2013 5:52 am