अरुणाचल प्रदेशाजवळून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्याचे जिनपिंग यांचे आदेश

बीजिंग : चीनमधील सिचुआन प्रांत ते तिबेटमधील लिंझी या भागांना जोडणाऱ्या ४७.८ अब्ज डॉलरच्या रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू करण्याचे आदेश चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी दिले. तिबेटमधून जाणारा हा रेल्वेमार्ग अरुणाचल प्रदेश सीमेजवळून जाणार असल्याने पुन्हा एकदा भारत-चीन सीमावाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

क्युंघाई-तिबेट प्रकल्पानंतर सिचुआन-तिबेट रेल्वे प्रकल्प तिबेटमधील दुसरा प्रकल्प आहे, हा मार्ग क्युंघाई-तिबेट पठाराच्या नैर्ऋत्या भागातून जाणार आहे आणि तो भाग भौगोलिकदृष्टय़ा  जगातील सर्वात अधिक सक्रिय भाग आहे.

तिबेटमधील ज्या लिंझी भागाला ही रेल्वे जोडली जाणार आहे तो भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेच्या अगदी जवळून जाणारा आहे. हा मार्ग आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे जिनपिंग यांचे म्हणणे आहे. भारत आणि चीन यांच्यात ३४८८ कि.मी. लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून वाद आहे. चीनने अरुणाचल प्रदेशवर कायमच दक्षिण तिबेट म्हणून दावा केला आहे, मात्र तो भारताने कायम नाकारला आहे.

चर्चेची पुढील फेरी याच आठवडय़ात?

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळ चर्चा सुरू आहे, मात्र दोन्ही देशांमध्ये या आठवडय़ात लष्करी स्तरावर विशिष्ट प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता असून त्यातून मार्ग निघण्याचे संकेत मिळत आहेत, असे रविवारी अधिकृत सूत्रांनी सांगितले.