संयुक्त राष्ट्रांत सुरक्षा मंडळ अध्यक्षाच्या नात्याने भारताची भू्मिका 

संयुक्त राष्ट्रे

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा अध्यक्ष या नात्याने काम करताना दहशतवादाला होणारा अर्थपुरवठा व दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी वापरली जाणारी आधुनिक तंत्रे  यांना लगाम घालण्यासाठी प्रयत्न करील, असे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले.

भारत २०२१—२२ या काळात सुरक्षा मंडळाचा अस्थायी सदस्यही आहे.  त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचे अध्यक्षपदही भूषवित आहे. हे अध्यक्षपद फिरते असते. ते वेगवेगळ्या देशांना दिले जाते. संयुक्त  राष्ट्रातील कार्यक्रमांबाबत तिरुमूर्ती यांनी सांगितले की, सागरी सुरक्षा, दहशतवादाचा मुकाबला व शांततारक्षण या मुद्दय़ांना प्राधान्य दिले जाईल. पंतप्रधान मोदी हे सागरी सुरक्षेवर नऊ ऑगस्टला होणाऱ्या चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवतील. सागरी सुरक्षेचा प्रश्न आफ्रिकेसाठी महत्त्वाचा असल्याने काँगोचे अध्यक्ष  फेलिक्स अँटॉइन त्सिसेकेडी शिलोम्बो या कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने होईल. परराष्ट्र मंत्री जयशंकर हे १८ ऑगस्टला शांततारक्षण व तंत्रज्ञान यावर आयोजित चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांच्या आयसिसवरील अहवालाबाबतच्या चर्चेत ते १९ ऑगस्टला सहभागी होणार आहेत. आयसिसच्या अहवालात पाकिस्तानातील प्रतिबंधित जैश ए महंमद व लष्कर ए तयबा या संघटनांचा समावेश आहे का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, दहशतवादाच्या मुकाबल्याबाबत भारत एक वेगळा कार्यक्रम आयोजित करून त्यावर प्रकाश टाकेल. सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवादच नव्हे तर दहशतवादी वापरत असलेले नवे तंत्रज्ञान व त्यांना होणारा अर्थपुरवठा यावर त्यात चर्चा होईल. याशिवाय सध्या आयसिसच्या कारवाया जगभरात अनेक देशात चालू आहेत.