22 November 2019

News Flash

‘एनएसजी’ सदस्यत्वासाठी भारताचा अर्ज दाखल

‘एनएसजी’ सदस्य देशांच्या ९-१० जून रोजी व्हिएन्ना येथे होणाऱ्या बैठकीत भारताच्या सदस्यात्वाविषयी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे

मोदींच्या अमेरिका दौऱ्यात मोर्चेबांधणीची शक्यता
आण्विक इंधन पुरवठादार देशांच्या गटाचे (न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप – एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताने १२ मे रोजी अधिकृतरीत्या अर्ज दाखल केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजपासून (४ जून) सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यात भारताची बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी होण्याचे संकेत दिसत आहेत.
‘एनएसजी’ सदस्य देशांच्या ९-१० जून रोजी व्हिएन्ना येथे होणाऱ्या बैठकीत भारताच्या सदस्यात्वाविषयी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी भारताला अनुकूल वातावरण तयार करण्यावर मोदींच्या या अमेरिका भेटीत मोठा भर असेल. त्यानंतर ‘एनएसजी’ची सेऊल येथे २३-२४ जून रोजी बैठक होत असून त्यात भारताच्या सदस्यत्वाबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.
४८ देशांच्या या जागतिक गटाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी सध्या खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आपली आणि सरकारची ताकद पणाला लावली असून विविध देशांना आपल्या बाजूने वळवण्यात परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी व्यस्त आहेत. भारताच्या सदस्यात्वाच्या मार्गात चीनचा मोठा अडथळा असून चीन पाकिस्तानला सदस्यत्व मिळवून देण्यास उत्सुक आहे. त्यामुळे पाकिस्तानने अर्ज भरण्याच्या आधी एक आठवडा भारताने अर्ज दाखल केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २४ मे रोजी चीनला दिलेल्या भेटीत चिनी नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. चीनकडून ठोस पाठिंबा मिळाला नसला तरी चर्चा करण्याचे आश्वासन मिळाले आहे.
भारताने आपली बाजू पुढे रेटण्यासाठी दोन मुद्दय़ांचा आधार घेतला आहे. नव्या जागतिक हवामानबदल करारानुसार भारताला देशाच्या एकूण इंधन वापरापैकी ४० टक्के इंधनाची गरज जीवाष्म इंधनाव्यतिरिक्त अन्य स्रोतांपासून भागवण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी अणुइंधन हा योग्य पर्याय आहे. त्यासाठी भारताला ‘एनएसजी’चे सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे. तसेच भारताला सदस्यत्व मिळाल्यास देशात कोणतेही सरकार असले तरी अणुइंधनाच्या व्यापारात एकसूत्रता येईल.

First Published on June 4, 2016 12:11 am

Web Title: india applies for nsg membership ahead of pm narendra modis us visit
Just Now!
X