बांगलादेशने भारताकडे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या त्यांच्या नागरीकांची यादी मागितली आहे. आम्ही भारताला त्यांच्या देशात बेकायद वास्तव्याला असणाऱ्या आमच्या नागरीकांची यादी सुपूर्द करण्याची विनंती केली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन यांनी रविवारी ही माहिती दिली. अब्दुल मोमेन यांनी मागच्या आठवडयात व्यस्त वेळापत्रकाचे कारण देऊन भारत दौरा रद्द केला होता.

एनआरसी संबंधी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “भारत-बांगलादेशचे संबंध खूप सामान्य आणि चांगले आहेत. एनआरसी हा भारताचा अंतर्गत विषय आहे. एनआरसीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर कुठलाही परिणाम होणार नाही असे आम्हाला भारताकडून आश्वासन मिळाले आहे.” आर्थिक कारणांमुळे काही भारतीय सुद्धा मध्यस्थामार्फत बांगलादेशमध्ये बेकायदा प्रवेश करत असल्याचा त्यांनी दावा केला.

“बांगलादेशमध्ये आमच्या नागरीकांव्यतिरिक्त अन्य कोणाचे बेकायदा वास्तव्य आढळून आले तर त्यांना माघारी पाठवू” असे मोमेन म्हणाले. भारताला लागून असणाऱ्या सीमेवरुन काही जण बांगलादेशमध्ये प्रवेश करतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.

अब्दुल मोमेन काय म्हणाले होते अमित शाहंबद्दल
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे भारताची धर्मनिरपेक्ष देश म्हणून असलेली ऐतिहासिक प्रतिमा कमकुवत होणार आहे असे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे. राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळताच मेमन यांनी ही प्रतिक्रिया दिली. “भारत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असलेला एका सहिष्णू देश आहे. पण भारत त्या मार्गावरुन विचलित झाल्यास त्यांचे ऐतिहासिक स्थान कमकुवत होईल” असे मेमन म्हणाले.

अल्पसंख्यांकांचा छळ करणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशचा समावेश केल्याबद्दल अब्दुल मेमन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोमणा मारला. “बांगलादेश इतका जातीय सलोखा असलेले देश फार कमी आहेत. अमित शाह काही महिने बांगलादेशमध्ये राहिले तर, त्यांना आमच्या देशातील आदर्श स्थिती दिसेल” असे मेमन म्हणाले.
“भारतामध्ये अनेक समस्या आहेत. त्यांच्यामधल्य वादांची आम्ही चिंता करत नाही. पण एक मित्र म्हणून आमच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होईल असे भारत काही करणार नाही अशी अपेक्षा आहे” असे मेमन म्हणाले.