पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांचा ठावठिकाणा हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे कुलभूषण यांना भेटून द्यावे, अशी मागणी भारताने केली आहे. भारताने आतापर्यंत १५ वेळा पाकिस्तानकडे यासंदर्भात मागणी केली आहे. मात्र, पाकिस्तानकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांचा सध्याचा ठावठिकाणा याबाबत भारताकडे कोणतीही माहिती नाही. हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागवे यांनी सांगितले. कुलभूषण जाधव यांच्यावर कायदेशीरपणे खटला चालवण्यात यावा, अशी मागणीही भारताने केली. गेल्या महिन्यात हेरगिरी आणि पाकिस्तानविरुद्ध घातपाती कारवाया केल्याच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जाधव यांच्यावर कायदेशीरपणे खटला चालवण्यात आल्याचा पाकिस्तानचा दावा खरा असेल तर, त्यांनी आम्हाला एकदा कुलभूषण जाधव यांना भेटून द्यावे. आम्ही यापूर्वी १४ वेळा त्यांच्या ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ची मागणी केली आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची आणि ठावठिकाण्याची चिंता वाटते, असे बागवे यांनी सांगितले.

भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांच्यावरील कायदेशीर कारवाईचे पुरावे मागण्याची ही दुसरी वेळ आहे. जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने लगेच त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची प्रत मागितली होती. मात्र, जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने अजूनपर्यंत या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी भारतीय प्रसारमाध्यमे एकूणच परिस्थितीचे अतिरंजित वर्णन करत असल्याची टीका केली. मात्र, पाकिस्तानने जाधव यांचे अपहरण केले, असा दावा भारताने केला आहे. जाधव यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले आरोपपत्रही संशयास्पद असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले होते.