“करोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत भारत चांगल्या स्थितीमध्ये आहे. आपण सर्वजण मिळून निर्धाराने, जोमाने करोना विरोधात लढू”, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी म्हणाले. अमित शाह आज केंद्रीय सशस्त्र दलाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, त्यांनी करोना विरुद्धच्या लढाईत भारत चांगल्या स्थितीत असल्याचा दावा केला.

“करोना व्हायरस विरुद्ध जगात कुठे यशस्वी लढाई लढली गेली असेल, तर तो भारत देश आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने करोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे लढली आहे” असे अमित शाह म्हणाले. “भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. भारत करोना विरुद्ध लढाई कसा लढणार? अशी अनेकांच्या मनात शंका होती. पण आज जग पाहतेय, भारताने करोना विरुद्ध यशस्वी लढाई लढली आहे” असे अमित शाह म्हणाले.

‘देशातील १३० कोटी जनता, सर्व राज्य आणि प्रत्येकाने एक देश म्हणून करोना विरुद्ध लढाई लढली आहे’ असे अमित शाह म्हणाले. “करोना विरुद्धच्या लढाईत आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आपण निर्धाराने करोना विरोधात लढाई सुरु ठेवू. घाबरुन जाण्यासारखी स्थिती नाही. करोनाला पराभूत करण्याची लढाई आपण जोमाने लढू” असे शाह या कार्यक्रमात सीएपीएफच्या प्रमुखांना संबोधित करताना म्हणाले.