राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी परस्पर सामरिक संबंध वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी पाच करारही केले.

कोविंद यांचे बुधवारी सिडनी येथे आगमन झाले. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मॅरिस पायने आणि कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या उच्चायुक्तांनी पाच करारांवर स्वाक्षऱ्या केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

पहिला करार दिव्यांगांना सेवा देण्याबाबत तर दुसरा करार दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑस्ट्रेड यांच्यात करण्यात आला. तिसरा करार रांचीतील सेंट्रल माइन प्लानिंग अ‍ॅण्ड डिझाइन इन्स्टिटय़ूट आणि कॅनबेरातील कॉमनवेल्थ सायण्टिफिक अ‍ॅण्ट रीसर्च ऑर्गनायझेशन यांच्यात करण्यात आला. कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठीचा चौथा करार गुंटूर येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात करण्यात आला. तर पाचवा करार संयुक्त पीएच.डी.बाबत दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था आणि ब्रिस्बेनमधील क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात करण्यात आला.