एकीकडे जगभरात चीनच्या विरोधातील वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे चीनच्या कुरापती सुरूच आहेत. अशातच आज (गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक केली. या बैठकीत दोन्ही देशांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांचे सैन्य तळ वापरता येणार आहेत. “हा करार म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मैत्रीचे नवे मॉडेल आहे,” असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारानंतर केला. याबैठकीतदरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. तसंच यावेळी आरोग्य सेवा, व्यवसाय आणि संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांच्य पंतप्रधानांनी चर्चा केली.

“या कठिण काळात ऑस्ट्रेलिया ज्या प्रमाणे त्यांच्या देशात राहणाऱ्या भारतीयांची, विशेषत: विद्यार्थ्यांची काळजी घेत आहे त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असं मोदी म्हणाले. “आम्ही या संकटकाळाकडे एक संधी म्हणून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच सर्वांना त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा, तसंच दोन्ही देशांमधील मैत्री अधिक घट्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असंही ते म्हणाले.

नव्या करारानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची लढाऊ जहाजं आणि लढाऊ विमानं एकमेकांच्या सैन्य तळांचा वापर करू शकणार आहेत. तसंच गरज भासल्यास त्यांना इंधनाचा पुरवठादेखील केला जाणार आहे. हिंद महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप पाहता तो रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्र आल्याचं म्हटलं जात आहे. भारतानं अमेरिकेसोबतही असाच एक करार केला आहे.

“भारत आणि ऑस्ट्रेलिया आपल्या द्विपक्षीय संबंधांना व्यापकरित्या वाढवण्यास कटिबग्ध आहे. हे केवळ या दोन देशांसाठीच नाही तर इंडो-पॅसिफिक क्षेत्र आणि संपूर्ण जगासाठीही आवश्यक आहे,” असं मोदी म्हणाले. हा करार म्हणजे चीनला दणका असल्याचं मानलं जात आहे. या करारामुळे ऑस्ट्रेलिया भारताच्या अंदमान निकोबार येथे असलेल्या नौदलाचा तळ वापरता येणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया जवळ असलेल्या कोकोज बेटावरील आपला नौदल तळ भारतासाठी खुला करणार आहे. यामुळे दोन्ही देशांचं नौदल हिंद महासागरातील मलक्का स्ट्रेट आणि आसपासच्या परिसरावर नजर ठेवू शकणार आहे. चीन या क्षेत्रात आपलं वर्चस्व वाढवू पाहत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांचं नौदल एकत्रित सरावही करणार आहे. याला ओसइंडेक्स असं नाव देण्यात आलं आहे.

संकटाचा फायदा घेण्याच्या तयारीत चीन

चीन करोनाच्या संकटाचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. या संकटाचा फायदा घेत हिंद महासागरात ऑस्ट्रेलियानजीक नौदलाचा तळ उभारण्याचा चीनचा मानस आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतीच्या नावावर चीनचं सोलोमन आयलंड आणि पापुआ न्यू गिनीवर लक्ष आहे. करोनामुळे हे देश संकटात सापडले आहेत. या देशांना कर्ज देऊन आपल्या कर्जाच्या बोझ्याखाली घेण्याची चीनची इच्छा असल्याचं मत काही जणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या तळाद्वारे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेवर नजर ठेवण्याचा चीनचा मानस असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलिया, चीनमध्ये वाद

गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेत ऑस्ट्रेलियानं युरोपिय युनियनच्या प्रस्तावाचं समर्थन करणं चीनच्या पचनी पडलेलं नाही. त्यानंतर चीननं ऑस्ट्रेलियाला अमेरिकेचा पाळीव कुत्रा असंही म्हटलं होतं. त्यानंतर चीननं ऑस्ट्रेलियावर ८० टक्के आयात शुल्क लादण्याचीही घोषणा केली होती.