भारत आणि बांगलादेशात झालेला जमीन हस्तांतरणाचा करार बांगलादेश दौऱयाचे फलीत असून दोन्ही देश केवळ पास-पास नसून आता साथ-साथ (एकत्र) असल्याचे जगाला समजेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगबंधू इंटरनॅशनल कनव्हेंशन सेंटरमध्ये भारतीयांना संबोधित करताना सांगितले.
दोन्ही देशातील तरुण पिढी ही आपली जमेची बाजू आहे. बांगलादेशने गेल्या काही वर्षांत सर्व स्तरांत स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. विकासाच्या मुद्द्यावर भारत नेहमी बांगलादेशच्या पाठीशी उभा राहिल, असे मोदी यावेळी म्हणाले. बांगलादेशातील सर्व महत्त्वाच्या पदांवर महिला नेतृत्त्व करत असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगत देशातील महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद असल्याचे मोदींनी सांगितले. भारत व बांगलादेशदरम्यान झालेल्या २२ करारामुळे जगातील विकासाचा पाया मजबूत होईल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला.
दहशतवादाच्या समस्येवर देखील मोदींनी भाष्य केले. दहशतवादाच्या मुद्यावर स्वत:ला झीरो टॉलरेंस देश घोषित करण्याचा संकल्प करणाऱया बांगलादेशचे कौतुक करायला हवे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून या विरोधात सर्व देशांनी एकत्र लढले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 8:15 am