भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारपासून सीमा सुरक्षा दलांमध्ये सुरक्षेशी निगडित प्रश्नांवरून चर्चेला सुरुवात झाली. ही चर्चा पाच दिवस चालणार आहे. अमली पदार्थाची आणि गुरांची तस्करी याबाबतही चर्चा केली जाणार आहे. भारत आणि बांगलादेश या देशांची सीमा जवळपास चार हजार कि.मी. इतकी आहे.
सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के. के. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील २१ सदस्यांचे शिष्टमंडळ बुधवारी ढाका येथे पोहोचले असून बांगलादेश सीमा दलाच्या पिलखानास्थित मुख्यालयात ही चर्चा होणार आहे. बांगलादेशच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व दलाचे प्रमुख मेजर जन. अझिझ अहमद हे करणार
आहेत.
यापूर्वी ही चर्चा गेल्या डिसेंबर महिन्यात होणार होती. मात्र ज्या दिवशी भारतीय शिष्टमंडळ रवाना होणार होते त्याच दिवशी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचे विमान कोसळून त्यामध्ये १० अधिकारी ठार झाले, त्यामुळे चर्चा पुढे ढकलण्यात आली होती.
भारतीय शिष्टमंडळात गृहमंत्रालय आणि सीमा यंत्रणांशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गुरांची आणि अमली पदार्थाची
तस्करी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.