मागील सात दिवसातील आकडेवारी देशाला काळजी टाकणारी आहे. देशात करोनामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण आढळून येत असून, मागील सात दिवसातील आकडेवारीनं भारत करोना उद्रेकाचा जागतिक केंद्रबिंदू ठरला आहे. देशातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वेगानं वाढत असून, गेल्या सात दिवसांत भारतात अमेरिका व ब्राझील या दोन देशांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

करोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशातील जनजीवन मार्चपासून विस्कळीत झालं आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतरही देशातील करोनाचा प्रसार थांबलेला नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली असून, देशातील मृत्यूचा आकडाही ५० हजारांच्या पुढे गेला आहे. या चिंतेत आता आणखी एका गोष्टीची भर पडली असून, मागील काही दिवसांतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक पातळीवर भारत करोनाचं हॉटस्पॉट ठरला आहे.

सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांपेक्षा जास्त रुग्ण भारतात मागील सात दिवसांत आढळून आले आहेत. जॉन हाफकिन्स विद्यापीठाच्या माहितीप्रमाणे भारतात दररोज ६० हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत आहे. ही संख्या अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांपेक्षा अधिक आहे.

भारतातील परिस्थिती चिंताजनक होत चालली असून, भारतात रुग्णसंख्या वाढीचा वेग ब्राझील व अमेरिकेपेक्षा जास्त आहे. ब्राझीलचा रुग्ण दुपटीचा कालावधी सध्या ४७ दिवसांचा आहे, तर अमेरिकेचा ६५ दिवसांचा आहे. दुसरीकडे भारताचा दुपटीचा कालावधी २४ दिवसांचा आहे. २२ जुलै रोजी अमेरिकेत रुग्णसंख्येचा उद्रेक झाला. याच कालावधीत अमेरिकेत आठवड्यात ६७ हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून आले. ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ होती. भारत हा विक्रमी आकडा लवकरच पार करेल, असं सध्याच्या वाढीवरून दिसून येत आहे.