सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे भारत लवकरच आंतरराष्ट्रीय न्यायनिवाड्याचे केंद्र बनेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी व्यक्त केले. दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई लवाद परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने परदेशी गुंतवणुकदारांमधील विश्वास वाढविण्यासाठी सुरू केलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेमुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारताला अधिक पसंती मिळत आहे. न्यायव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप न झाल्यास परदेशी गुंतवणुकदारांमधील विश्वास वाढेल. परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय लवादाचे केंद्र बनण्याची क्षमता वाढली असल्याचे सरन्यायाधीश खेहर यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय निवाड्याच्या प्रक्रियेत सरकार किंवा कोणत्याही यंत्रणेकडून हस्तक्षेप होणार नाही यासाठी भारतीय प्रशासनात वरिष्ठ पातळीवर हेतूपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारतातील व्यापार प्रक्रिया तटस्थ आहे, असा विश्वास गुंतवणुकदारांमध्ये निर्माण होईल. माझ्या मते आपण या प्रक्रियेला आणखी प्रोत्साहन दिले पाहिजे. भारतातील कायदेतज्ज्ञ आणि लवादांमुळे भविष्यात भारत आंतरराष्ट्रीय व्यापार लवादाचे केंद्रस्थान बनेल, असा विश्वास सरन्यायाधीश खेहर यांनी व्यक्त केला.

गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीवरून देशभरात वादळ उठले आहे. देशभरातील हायकोर्टांमध्ये न्यायाधीशांच्या नेमणुकीला विलंब होत असल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे कान उपटले आहेत. तुम्हाला न्यायव्यवस्था बंद पाडायची आहे का अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले होते.