03 June 2020

News Flash

सुरक्षा मंडळ सदस्यत्वासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना जबर धक्का बसला आहे कारण अमेरिका, चीन, रशिया या देशांनी सुरक्षा मंडळ सुधारणांबाबत चर्चेला विरोध केला

| August 13, 2015 03:55 am

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना जबर धक्का बसला आहे कारण अमेरिका, चीन, रशिया या देशांनी सुरक्षा मंडळ सुधारणांबाबत चर्चेला विरोध केला आहे. दीर्घकाळ चर्चेत असलेल्या सुधारणा योजनेच्या मसुद्यात सहभाग घेण्यास या देशांनी नकार दिला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष सॅम कुतेसा यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना सुधारणांबाबतच्या तरतुदींचा मसुदा ३१ जुलैला पाठवला आहे, काही देशांच्या गटांची भूमिका व सदस्य देशांची भूमिका मांडण्यात यावी असा त्याचा हेतू होता पण या मसुद्यात आम्ही आमचे म्हणणे मांडणार नाही, असे अमेरिका, रशिया व चीन यांनी सांगितले.
अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील दूत समंथा पॉवर यांनी कुतेसा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की तत्त्वत: अमेरिकेची भूमिका खुली असून स्थायी व अस्थायी सदस्यांचा विस्तार एका ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असू नये. एखाद्या देशाला असे सदस्यत्व देताना त्याची आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेसाठी काम करण्याच्या प्रयत्नांची माहिती व क्षमता या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. या सदस्यत्वासाठी देशविशिष्ट विचार केला जाईल. नकाराधिकाराचा विस्तार किंवा त्यात बदल करण्यास अमेरिकेचा विरोध आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्थान मिळण्यास पाठिंबा दर्शवला होता पण आता ते दुटप्पीपणा करीत आहेत. रशियाने भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता पण त्यांनीही कुतेसा यांना पत्र पाठवून सुरक्षा मंडळात सुधारणा करताना नकाराधिकाराचा अधिकार नवीन सदस्यांना देऊ नये असे म्हटले आहे. सुरक्षा मंडळात भारताला स्थान देण्याच्या प्रक्रियेत विलंब केला जात आहे, असा आरोप भारताचे राजदूत अशोक कुमार मुखर्जी यांनी केला. संयुक्त राष्ट्रांचा सत्तरावा वर्धापन दिन या वर्षी साजरा होत असून त्या निमित्ताने सुधारणा प्रक्रिया राबवावी असे भारताला वाटते. चीनच्या मतानुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांना अनेक पैलू आहेत, सदस्य संख्या वाढवण्याबरोबरच कार्यक्षमता वृद्धीसही महत्त्व आहे. सुरक्षा मंडळातील सदस्य देशांमध्येच सुधारणांबाबत मतभेद आहेत. सुरक्षा मंडळात नवे सदस्य द्यायचे झाले, तर त्याची निवड काळजीपूर्वक व योग्य असली पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 3:55 am

Web Title: india bid for permanent seat suffers blow
Next Stories
1 यकृत विकाराच्या निदानात लिमोनिन महत्त्वाचे
2 बाल्यावस्थेतील दूरस्थ दीर्घिकेचा शोध घेण्यात वैज्ञानिकांना यश
3 ‘ललितअस्त्रा’वर ‘बोफोर्स’चा मारा
Just Now!
X