नवी दिल्ली : भारत बायोटेक या कंपनीने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व आयसीएमआर यांच्या सहकार्याने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक व आशादायी  असल्याचे रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील प्रमुख संशोधक डॉ. सविता वर्मा यांनी म्हटले आहे.

वर्मा यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात आणखी सहाजणांना कोव्हॅक्सिन ही लस टोचण्यात आली. त्यामुळे आता पहिला टप्पा पूर्ण झाला असून देशात एकूण पन्नासजणांना लस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत.

रोहतक येथे पहिल्या टप्प्याची सुरुवात १७ जुलैला करण्यात आली होती. त्या दिवशी तीनजणांना लस टोचण्यात आली. करोनावरील ही लस दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात एका तीस वर्षांच्या व्यक्तीलाही देण्यात आली होती. कोव्हॅक्सिनचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा यातील चाचण्या पूर्ण होण्यास १ वर्ष तीन महिने लागणार आहेत. कोव्हॅक्सिन या लशीला मानवी चाचण्यासाठी भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली होती. याशिवाय झायडस कॅडिला कंपनीने तयार केलेल्या लशीच्या चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

कोव्हॅक्सिनची निर्मिती सार्स सीओव्ही २ विषाणूच्या मृत कणांपासून करण्यात आली असून त्यामुळे विषाणूची लागण होत नाही, पण तरी प्रतिपिंड तयार होतात.  शुक्रवारी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात तीस वर्षांच्या व्यक्तीला ०.५ मि. लि. लस देण्यात आली. त्या व्यक्तीवर आता दोन आठवडे देखरेख केली जाणार असून नंतर दुसरा डोस दिला जाईल.

या प्रयोगातील प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, या व्यक्तीवर सुरुवातीचे दोन तास लक्ष ठेवले गेले त्यात वाईट परिणाम दिसले नाहीत. पाटणा येथे नऊजणांना लस टोचण्यात आली असून आणखी १८-२० जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ लोकांवर प्रयोग केले  जाणार असून त्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात १०० लोकांना ती टोचली जाईल. मानवी चाचण्यांसाठी लस टोचून घेण्यासाठी ३५०० जणांचे अर्ज आले असून पहिला टप्पा महिनाभरात पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७५० जणांवर चाचणी केली जाईल, त्यात १२ ठिकाणी लोकांना ही लस दिली जाईल. पहिल्या टप्प्यात १८-२० लोकांच्या गटावर प्रयोग करण्यात आले असून त्याची माहिती संकलित करून माहिती व  सुरक्षा निरीक्षण कें द्राकडून त्याची शहानिशा केली  जाईल.

ऑक्सफर्डची लस

ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशीची चाचणीही सुरू  झाली असून काही लोकांना लस देण्यात आली आहे, असे प्रमुख संशोधक डॉ. सारा गिलबर्ट यांनी सांगितले. या संस्थेच्या लशीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही कंपनी अ‍ॅस्ट्राझेनका या परदेशी कंपनीसमवेत करीत आहे.