संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानने दिलेल्या धमकीला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास भारत समर्थ असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करील, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली होती.
प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही, आपण भारताचे संरक्षणमंत्री आहोत, पाकिस्तानचे नाही, देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास भारत समर्थ आहे, असे पर्रिकर म्हणाले. अण्वस्त्रे शोभेसाठी नाहीत, त्यांचा वापर करण्याचा पर्याय आहे, असे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते. त्यावर संरक्षणमंत्र्यांनी वरील भाष्य केले.
पाकिस्तानला स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रे वापरण्याची गरज भासल्यास त्यांचा वापर केला जाईल, असे ख्वाजा आसिफ यांनी एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याची सुटका केल्याबद्दल पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव चीनने रोखल्याबद्दल विचारले असता पर्रिकर म्हणाले की, हा प्रश्न  परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्याशी संबंधित आहे.