मुंबई, दिल्ली विमानतळांवर तपासणी सुरू; चीनमध्ये चौघांचा मृत्यू

मुंबई/ दिल्ली : चीनच्या वूआंग शहरात करोना विषाणूंची लागण मोठय़ा प्रमाणावर झाल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून १८९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. याचप्रमाणे देशातील दिल्ली आणि इतर विमानतळांवरही खबरदारी घेतली जात आहे. दिल्ली विमानतळावर चीन मार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी खास कक्ष उभारण्यात आल्याचे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आले. केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

चीनमध्ये महिन्याभरापूर्वी करोना विषाणूंची लागण झाली असून ४१ रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने चाचण्या केल्यानंतर जगभरात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. करोना विषाणूमुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी जाणवते व वेळीच उपचार केला नाही तर न्यूमोनिया होतो. केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया, तैवानमध्ये रुग्ण

चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता २९१ झाली असून चौघांचा मृत्यू ओढवला आहे. ऑस्ट्रेलिया व तैवानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. फिलिपिन्समध्ये एका संशयित रुग्णाची तपासणी सुरू आहे. चीनमध्ये नव्याने लागण झालेल्यांची संख्या ८० असून ९०० जणांना देखरेखीखाली ठेवले आहे.

हा सार्स सदृश रोगाचा विषाणू असून चीन सरकारने त्याचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. हा विषाणू केवळ प्राण्यातून माणसात नव्हे तर माणसातून माणसातही पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. चीन सरकारचे तज्ज्ञ झोंग नानशान यांनी सांगितले, की हा विाषणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत संसर्ग करू शकतो. गेल्या महिन्यातील काही रुग्णांमध्ये हा विषाणू सागरी अन्नातून पसरल्याचा संशय आहे. आधी तो प्राण्यातून माणसात पसरतो असे गृहीत धरले गेले पण आता तो माणसातून माणसातही पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

वुहान हे या विषाणू संसर्गाचे केंद्र राहिले आहे. हे शहर मध्य चीनमध्ये असून तेथे सागरी अन्नाची मोठी बाजारपेठ आहे. वुहानमध्ये या विषाणूचे १९८ रुग्ण असून बीजिंग, शांघाय व ग्वाँगडाँगमध्ये २० जणांना लागण झाली आहे. दक्षिण कोरिया, थायलंड, जपान येथील परदेशी व्यक्तींमध्येही चार जणांना प्रादुर्भाव झाला आहे. ग्वाँगडाँग येथे दोन जण असे आहेत जे कधी वुहानला गेले नाहीत. त्यांचे नातेवाईक तेथे गेले होते.