सोशल मीडियावर एक व्हि़डिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये अनेक सैनिक आपापसात धक्काबुक्की करताना दिसत आहेत.


भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये १५ ऑगस्ट रोजी हा धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचे समोर आले होते. या धक्काबुक्की दरम्यान दगडफेकही झाली होती. मात्र, चीनने अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. मात्र, आता या व्हायरल व्हिडिओत चिनी सैनिक दगडफेक करताना दिसत आहेत. यामध्ये एका सैनिकाजवळ चीनचा झेंडाही दिसत आहे. हा व्हिडिओ लडाखमधील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये एका बाजूला सरोरवरही दिसत आहे. यामध्ये ५० पेक्षा अधिक सैनिक दिसत आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, चीनचे १५ सैनिक लडाखमध्ये १५ ऑगस्टच्या सकाळी साडेसात वाजता पानगोंग सरोवराच्या किनाऱ्यावरून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत होते. या सरोवराच्या दोन तृतीयांश जागेवर चीनचे तर एक तृतीयांश जागेवर भारताचे नियंत्रण आहे. ज्यावेळी चीनचे १५ सैनिक या दिशेने पुढे येत होते. त्याचवेळी सीमेवर तैनात भारतीय जवानांनी त्यांना थांबवले आणि त्यांना मागे फिरण्याचा इशारा दिला. मात्र, अनेकदा इशारा देऊनही चिनी सैनिक त्या ठिकाणाहून हटण्यास तयार नव्हते.

दरम्यान, चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले. यावेळी आयटीबीपीच्या जवानांनी त्यांना कारवाईची धमकी दिली. मात्र, या हटवादी चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर दगफेक करण्यास सुरुवात केली. मात्र, चीनच्या या कृतीला भारतीय सेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन्ही ठिकाणचे जवान किरकोळ जखमी झाले होते.