अमेरिकन मुत्सद्दय़ाच्या वक्तव्याला चीनची हरकत

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अंतर्गत भाग आहे, या अमेरिकेच्या मुत्सद्दय़ाने व्यक्त केलेल्या मताला चीनने हरकत घेतली आहे. भारत-चीन सीमावादात तिसऱ्या देशाने बेजबाबदारपणे केलेल्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होणार नाही का, याबाबत चीनने अमेरिकेकडून स्पष्टीकरण मागण्याचे ठरविले आहे.

अमेरिकेच्या मुत्सद्दय़ाने केलेल्या वक्तव्याची चीनने दखल घेतली आहे आणि अमेरिकेकडे त्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका उत्तरात म्हटले आहे.

अमेरिकेचे राजकीय मुत्सद्दी क्रेग एल. हॉल यांनी कोलकाता येथे, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अंतर्गत भाग असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असल्याचा दावा चीनने केला आहे.

अमेरिकेच्या मुत्सद्दय़ाने केलेले वक्तव्य म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास आहे, असे चीनचे म्हणणे आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अंतर्गत भाग आहे याची अमेरिकेला जाणीव आहे, असे वक्तव्य हॉल यांनी इटानगरमध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कालिखो पुल यांच्याशी चर्चा करताना केले होते.

यावर चीनने म्हटले आहे की, भारत आणि चीन यांच्यातील प्रश्नांबाबत निर्णय घेण्याची क्षमता दोन्ही देशांमध्ये आहे, त्यामध्ये तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप केल्यास हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होईल आणि ते बेजबाबदारपणाचे आहे. गेल्या महिन्यांत भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावरून चर्चेची १९वी फेरी झाली.