पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीन बरोबर चर्चा सुरु ठेवली पाहिजे असे केंद्र सरकारचे मत आहे. पण त्याचवेळी गरज पडेल तेव्हा, लष्करी प्रत्युत्तर देण्यासाठी सुद्धा तयार असलं पाहिजे, यावर सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर एकमत होत आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेमध्ये टक्कर, लढाई हे शब्द आले. उच्चस्तरीय सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली.

“आम्हाला तणाव वाढवायचा नाही. पण चीनच्या दबावासमोर झुकून तडजोड सुद्धा करणार नाही. आम्ही माघार घेणार नाही. आम्ही त्यांचा सामना करु” असे या चर्चेमध्ये सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘चीन बरोबरच्या संघर्षात परिणामांचा विचार केल्यास तुम्हाला पुढे जाणे शक्य होणार नाही ही सरकारची भूमिका आहे’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.

गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चीनकडून प्रयत्न होताना दिसत नाहीयत, हे सुद्धा लष्करी कारवाईच्या निर्णयावर एकमत होण्यामागचे एक कारण आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले.

भारताकडून चीन सीमेवर प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली

भारत-चीन यांच्या दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढलेला असताना चीनने लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स सीमेवर पाठवल्यानंतर आता भारतीय लष्करानेही जमिनीवरून हवेत मारा करणारी प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली पूर्व लडाखमध्ये तैनात केली आहे.

गलवान येथे चिनी सैन्याने केलेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान मारले गेल्यानंतर दोन्ही देशांतील वाद खूपच विकोपाला गेलेला असून या घटनेनंतर राजनैतिक व लष्करी पातळीवर चर्चा होऊनही त्यात फारसे काही साध्य झालेले नाही. भारत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीमेवर चीनने मोर्चेबांधणी सुरूच ठेवली असल्याने आता भारतीय लष्कर व हवाई दल यांची हवाई संरक्षण प्रणाली चीनचे कुठलेही दुसाहस हाणून पाडण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.