भारतीय पत्रकारांच्या दौऱ्यास चीनकडून प्रचारकी स्वरूप

चीनचे सैन्य सध्या डोकलामपासून हजारो किलोमीटर दूर आहे, पण भारतीय लष्कराने संघर्ष टाळण्यासाठी आमच्या प्रदेशातून माघार घ्यावी अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा निर्वाणीचा इशारा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल ली ली यांनी दिला आहे. भारतीय पत्रकारांच्या एका गटाने चीन सरकारने प्रायोजित केलेल्या कार्यक्रमानुसार तेथे चीनला भेट दिली असता चीन सरकारने तेथेही त्यांची बाजू मांडून प्रचार मोहीम सुरू केली.

चिनी लष्कराचा संदेश भारतीय पत्रकारांपुढे मांडण्यात आला. डोकलाम भागात दोन्ही देशांत दोन महिने संघर्ष चालू आहे. वरिष्ठ कर्नल ली यांनी भारतीय पत्रकारांना सांगितले, की भारतीय सैन्याने चीनच्या प्रदेशात घूसखोरी केली आहे. चिनी सैनिकांना काय वाटते ते तुम्ही छापू शकता, मी सैनिक आहे. प्रादेशिक एकात्मतेच्या रक्षणासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, आमचा निर्धार पक्का आहे. भारतीय पत्रकारांना बीजिंग नजीकच्या एका तटबंदी असलेल्या ठिकाणी नेण्यात आले होते. या वेळी भारतीय प्रसारमाध्यमांसमोर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या लढाऊ कौशल्यांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. दहशतवाद विरोधी संघर्ष व आमनेसामने लढाईतील शत्रू सैन्यावर गोळीबाराची कौशल्ये दाखवण्यात आली. पायदळाने काही प्रात्यक्षिके सादर केली.

या प्रात्यक्षिकांचा संबंध डोकलामशी नाही असे सांगून त्या भागात भारताचे ४८ सैनिक आहेत असे त्यांनी स्पष्ट केले, मात्र सीमेनजीक भारताचे बरेच सैन्य आहे, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच केला होता.

डोकलामबाबत ली यांनी सांगितले, की भारतीय बाजूने काय कृती केली जाते यावर पीपल्स लिबरेशन आर्मीचा प्रतिसाद अवलंबून आहे. जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा आम्ही कारवाई करू. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना व केंद्रीय लष्करी आयोगाचे आदेश आम्ही पाळू.

ज्या ठिकाणी भारतीय पत्रकारांना नेण्यात आले तेथे ११ हजार सैनिक आहेत. चीनचे एकूण सैन्य २३ लाख आहे. भारताने सीमा ओलांडून घूसखोरी करणे अपेक्षित नव्हते, त्यामागे भूसामरिक गैरसमजांचा भाग आहे, अशी टीका चायना डेलीने केली असून, ही घूसखोरी म्हणजे चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वावरचा घाला आहे.

प्रादेशिक रक्षणासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याचा कायदेशीर हक्क चीनला आहे. शेजारी देशांमध्ये गैरसमज होतात हे आम्ही समजू शकतो, पण भारताने आता प्रामाणिकपणे संवाद सुरू करावा. केवळ बेकायदेशीर प्रक्षोभक कृती करू नयेत, असे चायना डेलीने म्हटले आहे. शेजारी देशाची शत्रूचे आक्रमण मोडून काढण्याची क्षमता आहे हे भारताने लक्षात ठेवावे व त्यानुसार कृती करावी. आता वेळ थोडा आहे. मुखभंग टाळण्यासाठी भारताने सैन्य माघारी घ्यावे, असा इशाराही देण्यात आला आहे.