डोकलाममधून दोन्ही देशांनी एकाच वेळी सैन्य मागे घेण्याचा भारताचा प्रस्ताव चीनने धुडकावून लावला असून या प्रश्नाचा संबंध काश्मीरशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताकडून सीमेवरील तिठय़ाचा मुद्दा उपस्थित केला जाणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही जर काश्मीर किंवा उत्तराखंडमधील कालापानी प्रदेशात घुसलो तर कसे, असा प्रश्न चीनच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकारी वँग वेनली यांनी केला आहे. चीनच्या आमंत्रणावरून चीनमध्ये गेलेल्या भारतीय पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी हा उल्लेख केला.

भारताने भारत-भूतान-चीन यांच्या सीमा जेथे एकत्र येतात त्या ठिकाणी हा डोकलामचा वादग्रस्त प्रदेश आहे, असा बचाव करण्याला काही अर्थ नाही. डोकलाम हा चीनचा भाग आहे. भारताचा एक सैनिक, एक दिवस जरी तेथे असला तरी तो आमच्या सार्वभौमत्वाचा भंग आहे. भारताच्या सीमेवर अन्य ठिकाणीही असे तिठे आहेत.

उत्तराखंडमधील कालापानी प्रदेशात भारत-चीन आणि नेपाळच्या सीमा एकत्र भिडतात. तेथे किंवा जम्मू-काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसल्यास भारताला कसे वाटेल, असा प्रश्न वँग वेनली यांनी उपस्थित केला. तसेच जोपर्यंत भारतीय सैन्य डोकलाममधून पूर्ण माघार घेत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

काश्मीरच्या की प्रदेशाबाबत भारताचा पाकिस्तान आणि चीनबरोबर वाद आहे, तर कालापानी प्रदेशावरील हक्कावरून भारत व नेपाळ यांच्यात वाद आहे. तसेच डोकलामवरून चीन व भूतानमध्ये वाद आहे. या संपूर्ण तणावाच्या प्रसंगात चीनने प्रथमच डोकलामचा संबंध काश्मीर व कालापानीशी जोडला आहे.

डोकलामवरील चीनच्या मालकीला भूतानचा पाठिंबा : चीनचा दावा

डोकलाम हा चीनचा प्रदेश असल्याचे भूतानने मान्य केले असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकारी वँग वेनली यांनी म्हटले आहे. चीन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय पत्रकारांना वेनली यांनी ही माहिती दिली, मात्र त्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केला नाही. भूतानकडून अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.