भारत-चीन सीमेवरील तणाव हळूहळू निवळताना दिसत आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात आमने-सामने आलेलं भारतीय व चिनी सैन्य माघारी फिरलं आहे. पँगाँगमध्ये चीननं पूर्णपणे सैन्य माघारी घेतलं आहे. मात्र, भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पँगाँग सरोवर परिसरातील सैन्य माघारीचा हवाला देत देप्सांग परिसरातील उभारण्यात आलेल्या चिनी छावणीबद्दल मोदी सरकारला सवाल केला आहे.

गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चिनी लष्कराने (पीएलए) पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने एकदा चीनचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, त्यानंतर भारत-चीन सीमेवर काही काळ युद्ध सदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं. या काळात भारत आणि चीन यांच्या लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू होती.

अखेर मागील आठवड्यात चर्चेला यश आलं. दोन्ही देशांनी पँगाँग सरोवर परिसरातील लष्कर मागे घेण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर पँगाँगमधील लष्कर चीननं मागे घेतलं आहे. या सगळ्या घटनेनंतर स्वामी यांनी ट्विट करत मोदी सरकारला सवाल केला आहे.

“चीन व भारताने पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचं काही माध्यमांनी घोषित करून टाकलं आहे. म्हणजेच जूनमध्ये भारतीय लष्कराने एलएसी पार केले होते. ते ठिकाण आपण सोडले आहे. पण, देप्सांगच काय, जिथे चीनच्या लष्कराने छावण्या उभारल्या आहेत? शांतता,” असा सवाल स्वामी यांनी मोदी सरकारला केला आहे.

आज पुन्हा चर्चा…

सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये आज, शनिवारी अन्य भागांतील माघारीबाबत वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चेची पुढची फेरी होत आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरून सैन्य आणि शस्त्रास्त्रांसह अन्य सामग्रीही माघारी घेतल्याची उपग्रह छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत.