भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी तसेच दोन्ही देशांच्या लष्करामध्ये सुसंवादाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी येत्या १० आणि ११ फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमधील चर्चेची १७ वी फेरी पार पडणार आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीमा संरक्षण सहकार्य करार झाल्यानंतर प्रथमच ही चर्चा होणार आहे.  
भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाच्या प्रश्नासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवरही दोन्ही देशांचे प्रतिनिधी चर्चा करणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन तर चीनतर्फे यांग जिएची हे नेतृत्व करणार आहेत. या चर्चेदरम्यान अफगाणिस्तानमधील विद्यमान परिस्थितीबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
दोन्ही देशांमधील चर्चेची १६ वी फेरी गेल्या वर्षी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या चीन दौऱ्यादरम्यान पार पडली होती. त्या चर्चेत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच दोन्ही देशांमधील विश्वासाचे वातावरण अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला होता.