पूर्व लडाखमध्ये गलवानच्या खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चिनी सैन्यातील काही जवानांच्या मृत्यूनंतर पँगाँग सरोवर परिसरातही भारतीय सैन्याने चिनी सैन्याला चांगला धडा शिकवला. २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री भारतीय लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे चिनी सैन्याचा भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा डाव त्यांच्यावरच उलटला. यामुळे आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चांगलेच नाराज असल्याचे समजते. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली लडाख सीमेवर तैनात असणारे पीएलएचे (पिपल्स लिब्रेशन आर्मीचे) लष्करी अधिकाऱ्यांवरही जिनपिंग संतापले आहेत. त्यामुळे लवकरच चीनच्या लष्करामध्ये मोठे बदल केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-चीनदरम्यान लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय लष्कराने चिनी सैन्यावर कुरघोडी करत अनेक मौक्याचे प्रदेश ताब्यात घेतल्याने बीजिंगकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. चीनच्या पीएलएने २९-२० ऑगस्टच्या रात्री लेक स्पांगूर परिसरामधून भारतीय हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला. त्यानंतर भारतीय लष्कारने अनेक मौक्याची आणि उंचावरील ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. यासंदर्भातील माहिती बीजिंगपर्यंत पोहचली तेव्हा मोठा गोंधळ झाला आणि जिनपिंग यांनी चिनी सैन्याच्या कामगिरीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. जिनपिंग सध्या चिनी लष्कराबरोबरच अधिकाऱ्यांवरही चांगलेच संतापले आहेत.

लवकरच मोठे बदल

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीएलए येथे तैनात करण्यात आलेल्या चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराबरोबरचा संघर्ष थांबवण्यासाठी चिनी सैन्याला मागे हटण्यासंदर्भातील आदेश दिले. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनाही चिनी सैन्य मागे हटल्यासंदर्भातील वृत्तांकन केलं आहे. यामुळेच आता कप्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिनपिंग यांनी चिनी लष्कराबरोबरच रेग्युलर लॉ इन्फोर्समेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही महत्वाच्या संस्थामध्ये लवकरच मोठे बदल केले जातील असं म्हटलं जात आहे. चीनमधील राजकीय पक्षासंदर्भात कमी होत चालेली विश्वासार्हता आणि सामाजिक अशांततेसंदर्भात जिनपिंग सध्या खूपच अस्वस्थ असल्याचेही वृत्त आहे.

कोणाच्या सांगण्यावरुन लष्कर मागे फिरलं?

पँगाँग सरोवराजवळच दक्षिणेकडील टेकडीवर चीनला ताबा मिळवायचा आहे. ही टेकडी राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्वाची आहे. खरं तर ही टेकडी भारतीय सीमेवर आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराने चीनचा डाव लक्षात घेत या टेकडीच्या आजूबाजूला विशेष ऑप्रेशन बटालियन तैनात केली होती. या बटालियनने केवळ चिनी सैनिकांना हुसकावलेच नाही तर ही संपूर्ण टेकडी ताब्यात घेतली. आता या टेकडीवरुन आणि प्रदेशातून चिनी लष्कर कोणाच्या आदेशाने माघारी फिरलं यावरुन जिनपिंग संतापले आहेत.

२४ तासांमध्ये पाच पत्रकं

यापूर्वी १५ जून रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या ६७ व्या वाढदिवसाच्या दिवशीच गलवान खोऱ्यामध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झाटापट झाली होती. यामध्ये चिनी लष्करालाही मोठं नुकसान झालं होतं. चीनने यासंदर्भातील माहिती दिली नसतील तरी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार या झटापटीमध्ये चीनचे ४० हून अधिक सैनिक मारले गेले. पँगाँग सरोवराजवळ झाालेल्या झटापटीनंतर चीनने २४ तासांमध्ये पाच वेळा प्रसिद्ध पत्रक जारी करुन आपली भूमिका मांडली. त्यापैकी दोन पत्रकही चिनी परराष्ट्र मंत्रालयाची, एक चिनी लष्कारचे, एक परराष्ट्र मंत्र्यांचे आणि भारतातील चिनी दूतावासाने जारी केलेलं पत्रक होतं.

युद्ध सराव

शक्तीप्रदर्शन करण्यासाठी चीनने तिबेटमध्ये युद्ध सराव सुरु केला आहे. चीनमधील सरकारी वृत्तवाहिनी असणाऱ्या सीजीटीएनने दिलेल्या माहितीनुसार या युद्ध सरावामध्ये एक हजार सैनिकांनी सहभाग घेतला आहे. हे सैनिक १०० गाड्यांमधून या ठिकाणी पोहचले आहेत. रेल्वेच्या माध्यमातून हे सैनिक येथे पोहचले आहेत. येथे चिनी लष्कराचे सैनिक टँक, मिसाईल आणि तोफांसंदर्भातील सराव करत आहेत.