डोकलाम वादावर भारताला मोठे यश मिळाले असून द्विपक्षीय चर्चेनंतर चीनने डोकलाममधून सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. भारतही डोकलाममधून सैन्य मागे घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यापूर्वी हा निर्णय झाल्याने दोन्ही देशांमधील तणाव कमी होणार आहे.

डोकलाम परिसरातील वर्चस्वावरुन भारत आणि चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वाद पेटला आहे. डोकलाम हा उंच पठाराचा भाग भूतानमध्ये असून भारत, चीन आणि भूतानच्या सीमा जेथे मिळतात तेथे हा परिसर आहे. डोकलामवर चीनने आपला हक्क सांगितला असून यावरुन भूतान आणि चीनमध्ये वाद सुरु आहे. डोकलाम परिसर भूतानमध्ये असल्याने भारताचा त्याच्याशी थेट संबंध नाही. मात्र भारत आणि भूतान यांच्यात संरक्षण करार झाला असून त्यानुसार भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. डोकलाममध्ये चीनचे सैन्य पोहोचताच भूतानने भारताकडे मदत मागितली. डोकलाम हा वादग्रस्त परिसर सिलिगुडी कॉरिडॉर नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या भूभागाजवळ आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली होती. दोन महिन्यांपासून दोन्ही देशांचे सैन्य या परिसरात ठाण मांडून होते. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला होता. ६ जूनरोजी चीनने बुलडोझरचा वापर करुन भारतीय बंकर नष्ट केले होते. भारताने यावर आक्षेप घेतला होता. तर चीनने भारताचा दावा फेटाळून लावला होता.

गेल्या काही दिवसांपासून या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु होती. या चर्चेत भारताला मोठे यश मिळाले असून चर्चेअंती दोन्ही देशांनी डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आल्याने दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल अशी शक्यता आहे.