पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून मोदी सरकारला लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे चीनसोबत सीमेवरून सैन्य माघारीची चर्चाही सुरू आहे. पेगॅसस पाठोपाठ राहुल गांधी यांनी चीन सीमावादावरून मोदी सरकारला सवाल केला आहे. भारत आणि चीनमध्ये १२वी लष्करी बैठक पार पडल्यानंतर राहुल गांधींनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षापासून भारत-चीन सीमावादाचा विषय ज्वलंत बनला. यासंघर्षानंतरही भारताच्या इतर भागातही चिनी लष्कराकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर दोन्ही देशांनी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू केली असून, चर्चेची बारावी फेरी नुकतीच पार पडली. या चर्चेत लडाखच्या पूर्वेकडील सीमेवर असलेल्या तीन पॉईंटपैकी दोन पॉईंटवरून मागे हटण्याची तयारी चीनने दर्शवली आहे.

हे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारची भारत-चीन सीमावादावरून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी ट्वीट केलं असून, त्यात सरकारला सवाल करण्यात आला आहे. “मोदीजी आणि त्यांची चापलुसी करणाऱ्यांनी हजारो किलोमीटरचा देशाचा भूप्रदेश चीनला देऊन टाकला. आता हा भूप्रदेश आपण कधी परत घेणार आहोत?”, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

भारत-चीन यांच्यात सुरू असलेल्या लष्करी स्तरावरील चर्चेच्या बाराव्या फेरीत वादग्रस्त असलेल्या तीन पॉईंटमधून माघार घेण्यावर चर्चा झाली. हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि डेप्सांग या तीन पॉईंटमध्ये चिनी सैन्याचं वास्तव्य असून, त्यावर भारताने आक्षेप घेतला. १२ तास चाललेल्या या बैठकीत चीनने हॉट स्प्रिंग आणि गोग्रा या दोन पॉईंटवरून सैन्य माघारी घेण्यास सहमती दर्शवली.