भारत-चीन सीमाप्रश्न सध्या दोन्ही देशातील कळीचा मुद्दा बनला आहे. गलवान व्हॅलीतील संघर्षापासून चीन सातत्यानं सीमेवर कुरापती करत असून, त्यामुळे सीमेवरील तणावाबरोबरच दोन्ही देशातील संबंध बिघडताना दिसत आहेत. सध्या लडाखमध्ये भारत-चिनी सैन्य आमनेसामने असतानाच भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी परराष्ट्र मंत्र्यांचा मॉस्कोचा दौरा रद्द करण्याचा सल्ला पंतप्रधानांना दिला आहे.

पूर्व लडाखमधील पॅगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्यानं २९-३० ऑगस्टच्या रात्री घुसखोरीचा प्रयत्न केला. जो भारतीय लष्करानं तत्परतेनं उधळून लावला. या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर दोन्ही देशातील सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सध्या दोन्ही देशाचे सैन्य सीमेवर ठाकले असून, तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे मॉस्कोच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

आणखी वाचा- लडाखमध्ये भारत-चीनच्या जवानांमध्ये पुन्हा संघर्ष?; भारतानं गोळीबार केल्याचा पीएलएचा आरोप

परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यावर खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आक्षेप घेतला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्लाही दिला आहे. स्वामी यांनी ट्विट करून म्हटलं आहे, “परराष्ट्रमंत्र्यांना मॉस्कोमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना का भेटायचं आहे? विशेषतः जेव्हा संरक्षण मंत्र्यांनी भेट घेतलेली असताना? ५ मे २०२० पासून तोडगा काढण्यासाठी भारताकडे परराष्ट्र धोरण नाहीये, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांना दौरा रद्द करण्यास सांगायला हवा. हे आपल्या संकल्पला कमी करत आहे,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- भारत-चीन वाद : ‘अरुणाचल प्रदेशला आम्ही कधी मान्यताच दिली नाही, तो तर दक्षिण तिबेटचा भाग’; चीनचा दावा

काय आहे सीमेवरील स्थिती?

चिनी सैन्यानं पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच आता सीमवेर गोळीबार झाल्याचंही वृत्त समोर येत आहे. चिनी सैन्यानं भारतीय चौक्यांच्या दिशेनं गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनीही गोळीबार केला. सीमेवर अशा पद्धतीनं तणावाची स्थिती असतानाच स्वामी यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या मॉस्को दौऱ्याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.