चिनी राजदूतांचे प्रतिपादन

मामल्लापुरम : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे महाबलीपुरम या मंदिरांच्या शहरात भव्य स्वागत करण्याची तयारी भारताने केली असतानाच; भारत व चीन यांचा एकमेकांना काहीही धोका नसून, आशियातील या दोन महासत्तांमधील सहकार्य वाढल्यास या भागातच नव्हे, तर यापलीकडेही शांतता व स्थैर्य सुनिश्चित करण्याबाबत सकारात्मक ऊर्जा ओतली जाईल, असे चीनने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषदेमुळे भारत-चीन संबंधांतील विकासाच्या दिशेबाबत ‘मार्गदर्शक तत्त्वांसह’ सहमतीचा नवा समुच्चय सुरू होईल, असे चीनचे राजदूत सुन वेडोंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

जगातील सर्वात मोठे विकसित देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून, या ‘गुंतागुंतीच्या जगात’ सकारात्मक ऊर्जा भरणे ही चीन व भारत यांची जबाबदारी आहे. ही परिषद द्विपक्षीय संबंधांना आणखी उंचीवर घेऊन जाईल आणि तिचा क्षेत्रीय आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि विकास यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल, असे सुन म्हणाले. भारत व चीन यांच्यात काश्मीरच्या मुद्दय़ावर वाढती अस्वस्थता असताना, विशेषत: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी जिनपिंग यांच्या भेटीदरम्यान हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, मोदी यांच्याशी अनौपचारिक चर्चेसाठी जिनपिंग हे सुमारे २४ तासांच्या दौऱ्यावर शुक्रवारी चेन्नई येथे पोहोचणार आहेत.

मोदी-जिनपिंग भेटीसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

मामल्लपुरम (तमिळनाडू) : भारत आणि चीन यांच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीपूर्वी तमिळनाडूतील मामल्लपुरम (महाबलीपुरम) शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्यामुळे त्याला अक्षरश: तटबंदी असलेल्या किल्ल्याचे स्वरूप आले आहे. याशिवाय शहराच्या सौंदर्यीकरणासह इतर तयारीही वेगात सुरू आहे. महाबलीपुरमच्या किनाऱ्यावर असलेल्या मंदिरांजवळ तटरक्षक दलाचे एक जहाज तैनात करण्यात आले असून सुरक्षाविषयक उपाययोजनांचा भाग म्हणून तमिळनाडूच्या निरनिराळ्या भागांतून बोलावलेले ५ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी शहरात व शहराभोवती तैनात करण्यात आले आहेत.