जपानमध्ये महिनाअखेरीस तिन्ही देशांचे नेते भेटणार; ‘एससीओ’ परिषदेतही फलदायी भेटीगाठी

भारत, रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक या महिनाअखेरीस होणार आहे. जपानमध्ये होत असलेल्या ‘जी-२०’ सदस्यदेशांच्या परिषदेच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे सहभागी होतील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच  रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांच्या स्वतंत्र भेटीगाठी झाल्या. त्या वेळी परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला गेला. याच चर्चेतून त्रिपक्षीय बैठकीचा विचार पुढे आल्याचे समजते.

दहशतवादाच्या मुद्दय़ावर आणि विशेषत्वाने मसूद अझरप्रकरणी रशियाने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. चीनने मात्र आतापर्यंत नकाराधिकाराचा वापर करून भारताची कोंडी केली होती. या वेळी प्रथमच रशियाने चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चीनने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास आडकाठी केलेली नाही. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकत आहे. भारताच्याही अनेक र्निबधांबद्दल अमेरिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या संबंधांमधील सकारात्मक बदलांना महत्त्व आले आहे. आता त्रिपक्षीय बैठकीत दहशतवादविरोधी लढा तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने चर्चा होण्याची शक्यता आहे.

चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्याशी मोदी यांची बिश्केक येथे भेट झाली. ही भेट अतिशय फलदायी होती, असे ट्वीट मोदी यांनी केले आहे. या भेटीत द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्याबाबत चर्चा झाली, तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचा निर्धार उभय नेत्यांनी व्यक्त केला.

या बैठकीआधी जिनपिंग आणि मोदी यांच्यात शिष्टमंडळ पातळीवर बैठकही झाली. उभय देशांतील अनेक मतभेदाचे मुद्दे संवादातून मार्गी लागत आहेत, असे मोदी यांनी सांगितले. बँक ऑफ चीनच्या शाखा भारतात काढू देण्याचा पेचही सुटल्याचे संकेत या वेळी देण्यात आले.

गेल्या महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीत विजयी होऊन मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर या दोन नेत्यांची ही पहिलीच भेट होती. जिनपिंग यांनी मोदी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले.

या भेटीपूर्वी, करांचा हत्यारासारखा वापर करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरुद्ध संयुक्त आघाडी उभारण्याच्या गरजेवर जिनपिंग भर देणार असल्याचे संकेत चीनने दिले होते. व्यापाराच्या मुद्दय़ावरून चीन आणि अमेरिका यांच्यात गेल्या वर्षभरापासून संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेने भारताचा विशेष प्राधान्य दर्जा काढून टाकल्यामुळे भारतालाही अमेरिकेशी आर्थिक संघर्षांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या मुद्दय़ावर भारताशी सहकार्याचे संबंध प्रस्थापित करता येतील, अशी चीनला आशा आहे. मोदी आणि पुतिन यांच्यात शिष्टमंडळ पातळीवरही बैठक झाली. उभय देशांतील मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प या वेळी सोडण्यात आला.

जिनपिंग यांची भारतभेट

जिनपिंग यांना मोदी यांनी भारतभेटीचे आमंत्रणही दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. या वर्षीच जिनपिंग यांचा भारत दौरा होणार आहे.

मोदींची रशिया भेट

रशियात सप्टेंबरमध्ये ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’ ही वार्षिक परिषद व्लादिवोस्तोक येथे होत आहे. रशियाच्या पूर्वेकडील प्रांतांचा आर्थिक विकास व्हावा आणि तेथे परकीय गुंतवणूक वाढावी, यासाठी ही परिषद आयोजिली जाते. यंदा या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आमंत्रित केले आहे. मोदी यांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले असून ते रशियाला भेट देणार आहेत.