चिनी संरक्षणमंत्र्याच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : भारत आणि चीन वादाचे मुद्दे संवेदनशीलतेने आणि परिपक्वतेने हाताळत आहेत. हे सीमेवरील शांततेतून प्रतीत होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे संरक्षणमंत्री वी फेंग यांच्या भेटीनंतर केले. चीनचे संरक्षणमंत्री चार दिवस भारताच्या भेटीवर आले असून त्यांनी मंगळवारी नवी दिल्लीत मोदींची भेट घेतली.

भारत आणि चीनमध्ये भूतानमधील डोकलामवरून झालेल्या वादानंतर वातावरण निवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोकलाम वादानंतर मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची चीनमधील वुहान, क्विंगडाओ आणि दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे भेट झाली होती. त्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि वी फेंग यांची एप्रिल महिन्यात बीजिंग येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत बेट झाली होती. त्यानंतर आता वेई भारतात आले असून बुधवारी ते सीतारामन यांची भेट घेणार आहेत.

मोदी यांनी वी यांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी वादांचे रूपांतर प्रत्यक्ष संघर्षांत होऊ देता कामा नये. भारत आणि चीन वादाचे मुद्दे संवेदनशीलतेने आणि परिपक्वतेने हाताळत आहेत. सीमाप्रदेशातील शांततेवरून ते स्पष्ट होत आहे, असे मोदी म्हणाले.

या भेटीत कोणतेही करार होण्याची शक्यता नसली तरी उभय देशांच्या लष्करांमध्ये वरिष्ठ पातळीवरील सहकार्य वाढवण्यास त्याने मदत होणार आहे. डोकलाम येथे चीनच्या सैन्याच्या नव्याने हालचाली होत असल्याच्या वृत्तांच्या पाश्र्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. भारतीय लष्कराने स्थिती नेहमीसारखीच असल्याचे म्हणत याला फारसे महत्त्व दिलेले नाही.