रोखठोक विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री कुणीही चीनचं नाव घेतलं नाही’, एका पत्रकारानं म्हटलं होतं. त्याला सुब्रमण्यम स्वामी यांनी उत्तर दिले.

गलवान व्हॅलीतील संघर्षापासून भारत-चीन सीमावादाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. मागील पाच महिन्यांपासून दोन्ही देशातील सीमेवर तणावाची स्थिती असून, चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सीमेवर चीनकडून झालेल्या अतिक्रमणावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून चीनचा उल्लेख टाळला जाताना दिसत आहे.

यावरूनच आशिष के सिंह यांनी प्रश्न उपस्थित करणारं ट्विट केलं होतं. त्या ट्विटवर सुब्रमण्यम स्वामी यांनी राजनाथ सिंह यांना टोला लगावला. “कुणीही चीनचं थेट नाव घेतलेलं नाही. ना संरक्षण मंत्री, ना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी. दुसरीकडे अमेरिकेच्या संरक्षण सचिव आणि राज्य सचिव दोघांनीही थेट चीनचं नाव घेऊन टीका केली आहे,” असं आशीष म्हणाले होते.

त्यावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले,”मला अशा बायका माहिती आहेत, ज्या त्यांच्या पतींना त्यांचं नाव घेऊन बोलवत नाहीत,” असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी राजनाथ सिंह व एस. जयशंकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुब्रमण्यम स्वामी हे सातत्यानं मोदी सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना दिसत आहे. भारत-चीन सीमावाद, नीट परीक्षा व इतर मुद्यांवरही स्वामी यांनी ट्विटरद्वारे भाष्य केलेलं आहे.