लडाखमध्ये सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर निर्माण झालेला भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होताना दिसत आहे. भारत आणि चिनी सैनिकांनी पॅगाँग लेकच्या ‘फिंगर’ परिसरातून आपलं सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर चर्चेची नववी फेरी पार पडल्यानंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु कऱण्यात आली आहे. ग्लोबल टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

चिनी राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन्ही बाजूने पॅगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर भागाकडे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत सैन्य मागे घेण्यासाठी दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावर अनेक बैठका पार पडल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, “प्लॅननुसार, चीन फिंगर ८ आणि भारतीय सैन्य फिंगर २ आणि फिंगर ३ पर्यंत आपलं सैन्य मागे घेणार आहे. फिंगर ४ पर्यंत दोन्ही देशांचे सैन्य गस्त घालणार नाहीत. हे टप्प्याटप्प्याने केलं जाणार आहे”.

चर्चेच्या नवव्या फेरीत काय झालं?
दोन्ही देशाच्या लष्करातील चर्चेची नववी फेरी जवळपास १६ तास सुरु होती. यावेळी दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांनी लडाखमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा आणि सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचं ठरवलं आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चेची दहावी फेरी पार पडणार आहे.