प्रमुख जागतिक आव्हानांचा प्रतिकार आणि उत्तम परस्पर सहकार्य संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत अमेरिकेला सहभागी करून घेण्याच्या ‘त्रिपक्षीय संकल्पने’ला भारत आणि चीन या देशांनी शनिवारी पाठिंबा दर्शवला.
भारत, चीन आणि अमेरिका यांच्यातील त्रिपक्षीय संकल्पनेचा माझा पाठिंबा आहे. माझ्यामते ही खूप चांगली कल्पना आहे. शांतता आणि विकास निर्मितीसाठी चीन कोणत्याही मुद्दय़ावर संवाद साधण्यास तयार आहे, असे चीनचे भारतातील राजदूत ले युचेंग यांनी सांगितले.
‘एकविसावे शतक घडवताना : भारत अमेरिका आणि चीन’ या विषयावरील परिसंवादात विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. या वेळी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनीही या संकल्पनेबद्दल आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की या प्रक्रियेमुळे द्विपक्षीय पातळीवर एकमेकांशी निगडित असलेले तीनही देशांमधील परस्पर सहकार्य आणखीन वाढीस लागेल. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही ही संकल्पना विचारयोग्य असल्याचे म्हटले.