बुलेट ट्रेनबाबत भारताचा जपानशी करार; अणुकरारासाठीही सहकार्य

देशातील पहिले ‘बुलेट ट्रेन’चे जाळे, नागरी अणुकरार सहकार्य सामंजस्य करारांसह दोन्ही देशांमधील संरक्षण तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीस आरंभ करणाऱ्या इतर महत्त्वाच्या करारांवर शनिवारी भारत आणि जपान यांच्यात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुंबई आणि अहमदाबाद यादरम्यान धावणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे ५०५ किमीचे हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्यातील चर्चेनंतर करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या वेळी अॅबे यांनी आर्थिक संबंध, याशिवाय दक्षिण चीन समुद्रातील तणावजन्य परिस्थिती, दहशतवाद आणि संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणांवर विशेष भर दिला. रम्यान, अॅबे यांनी भारताला संयुक्त राष्ट्रांचे स्थायी सदस्यत्व मिळण्यास पाठिंबा व्यक्त केला आहे.

’मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ९८ हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या
’दोन्ही देशांत संरक्षण सामग्री व लष्करी माहिती तंत्रज्ञान तसेच सुरक्षा यावरही करार झाला असून भारतात संरक्षण साहित्याची निर्मिती करण्यात येणार आहे
’अणुऊर्जेच्या शांततामय वापरात जपान भारताला सहकार्य करणार
’जपानी नागरिकांना भारतात प्रवेश करतानाच व्हिसा तातडीने देण्याची घोषणा केली असून १ मार्च २०१६ पासून ही योजना लागू करण्यात येत आहे. –