भारतीय तटरक्षक दलाने अंदमान द्वीप समुहाजवळ संशयीतरित्या फिरत असणारी म्यानमारची एक नौका ताब्यात घेतली आहे. याचबरोबर या नौकेतील सहाजणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्तचर संस्थांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

एका समुद्री मोहीमेदरम्यान भारतीय तटरक्षक दलाच्या अरूणा आसफ अली या जहाजाने शुक्रवार २० डिसेंबर रोजी, म्यानमारची एक नौका ताब्यात घेतली. यावेळी या नौकेत सहाजण होते. तटरक्षक दलाच्या माहितीनुसार ही नौका अंदमान बेटाजवळ संशयीतरित्या आढळून आली. आता ही नौका पुढील चौकशीसाठी पोर्ट ब्लेयरपर्यंत नेली जात आहे.

म्यानमारची नौका ताब्यात घेतल्यानंतर अंदमान द्वीप समुहाच्या समुद्री परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच परिसरात काही दिवस अगोदर चीनचे एक जहाज शी यान – १ हे देखील संशयीत अवस्थेत दिसले होते. ज्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने ते जहाज परतवून लावले होते. अंदमान द्वीप समूहाजवळ परदेशी जहाज व नौका आढळून येत असल्याने भारतीय तटरक्षक दल अधिकच सतर्क झाले आहे.